पुणेः पुणे-सातारा महामार्गावर खंबाटकी घाटात दरोडा टाकण्याचा तयारीत असलेल्या चार गुन्हेगारांना भुईंज गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने मुसक्या आवळल्या आहेत. चौघेही शिरूर तालुक्यातील आरोपी आहेत. पुढील तपास पोलिस करत आहेत. मौजे वेळे (ता. वाई, जि. सातारा) गावच्या हद्दीत ११ जून रोजी करुणा मंदिराच्या समोरील बाजूला, पुणे ते सातारा रस्त्याच्या झाडीमध्ये अंधारात पाच जण मोटरसायकलच्या बाजूला बसले होते. आरोपी महामार्गावरुन जाणा-या लक्झरी बस लुटणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
सहाय्यक निरिक्षक श्री. गर्जे यांनी वरिष्ठांनी दिलेल्या सुचनेप्रमाणे पथकाने सापळा लावून रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास अंधारात बसलेल्या व दरोडयाच्या तयारीत असलेल्या ४ संशयीतांना पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले. त्यांच्या सोबत असलेला अजून एक पाचवा साथीदार अंधाराचा फायदा घेऊन पळुन गेला.
आरोपींची चौकशी केल्यानंतर पुणे जिल्हयातील शिरुर तालुक्यातुन येवून खंबाटकी घाटामध्ये लक्झरी बस अडवून त्यातील प्रवाशांचे दागिने, पैसे लुटण्यासाठी त्या ठिकाणी थांबले असल्याचे त्यांनी सांगीतले. त्यांची तपासणी केली असता त्यांच्याकडे सुरा, प्लॅस्टिकच्या पिशवीत मिरचीची पुड, दोन लोखंडी रॉड, मोबाईल तसेच दोन मोटर सायकल असे एकूण २ लाख ७९ हजार रुपयाचे साहित्य जप्त करण्यात आले.
रविराज वर्णेकर यांच्या तक्रारीवरुन भुईज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पळून गेलेला आरोपीचा शोध सुरु आहे. दरम्यान पकडलेल्या आरोपींची नावे अक्षय दत्तात्रय शितोळे (वय २६), योगेश आनंदा वाळुंज (वय २५), संतोष बाळासाहेब चव्हाण (वय ३४), तिघेही (राहणार शिंदोडी ता. शिरुर जिल्हा पुणे), सिध्दांत यशवंत कांबळे (वय ३१ राहणार निमोने ता. शिरुर जिल्हा पुणे) अशी आहेत.
जिल्हा पोलिस प्रमुख समीर शेख, अपर पोलिस अधिक्षक श्रीमती आंचल दलाल, वाईचे उपविभागीय पोलिस अधिकारी बाळासाहेब भालचीम, एलसीबीचे पोलिस निरिक्षक अरुण देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली भुईंज पोलीस स्टेशनचे सहायक निरीक्षक रमेश गर्जे, फौजदार विशाल भंडारे, पोलीस अंमलदार ज्ञानदेव राजे, नितीन जाधव, आप्पासाहेब कोलवडकर, अजय सपकाळ, सोमनाथ बल्लाळ, , सागर मोहिते, रविराज वर्णेकर, किरण निंबाळकर, सुहास कांबळे यांनी या कारवाईत सहभाग घेतला होता.