अक्षय टेमगिरे
रांजणगाव गणपती : शिरूर तालुक्याचे वन विभागीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी नसल्याने आठवड्याच्या पहिल्याच दिवशी ओसाड पडले आहे. तर या कार्यालयाची रखवालदारी येथील एक वाहन चालक करीत असल्याचे निदर्शनास आल्याने शिरूर वन विभाग कार्यालयाचा अधिकारी सह कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार समोर आला आहे.
आज आठवड्याचा पहिला सोमवार दुपारी बारा वाजता शिरूर वन विभागीय कार्यालयामध्ये ना वनपरिक्षेत्र अधिकारी, ना लिपिक, ना कुठला अधिकारी, ना शिपाई या कार्यालयात उपस्थित नव्हता. या कार्यालयावर कोणाचा धाक आहे का नाही? अशी चर्चा नागरिक करत आहेत. या कार्यालयात असणारी महत्त्वाची कागदपत्रे कार्यालयीन अधिकारी किंवा वनपरिक्षेत्राधिकारी कोणाच्या भरवशावर ठेवत आहे. या कागदपत्रांची सुरक्षा रामभरोसेचं आहे.
सव्वा दहा ते साडे दहा पर्यंत सर्वच शासकीय कार्यालयीन कर्मचारी येणे गरजेचे असते. परंतु सव्वा बारा वाजले तरी शिरूर वन विभागीय कार्यालयाला कोणीच वाली नव्हता. त्यामुळे येथील टेबल खुर्चा या कर्मचाऱ्यांची वाट बघत असल्याचे दिसून आले. यावरून शिरूर वनविभागात सर्व अधिकारी आलेले नसल्याचे दिसून आले.
तालुक्यातून एखादा नागरिक काम घेऊन जर या कार्यालयात आला तर त्यांची कामे करणार कोण? वन विभागाच्या अशा या मनमानी कारभारामुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. शिरूर वनविभागीय कार्यालयाचे प्रमुख याकडे लक्ष देतील का? वन विभागाच्या मनमानी कारभाराची वरिष्ठ दखल घेणार आहेत का? असं झाल नाही तर कार्यालयाचे तीन तेरा नऊ बारा वाजणार हे नक्की.