शिरूर : अवकाळी पावसामुळे मागील काही दिवसांपासून गारठा वाढला आहे. शिरूर तालुक्यातील पाबळ परिसरात त्याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यासह पिकांवरही होताना दिसत आहे. सकाळी पडणाऱ्या दाट धुक्यांमुळे शेतकऱ्यांसह, विद्यार्थी, वाहनचालक यांना धुक्यामधून वाट शोधत जावे लागत आहे. धुक्यांमुळे शेतकऱ्यांचा फवारणीचा खर्च वाढला आहे.
कीटकनाशक फवारणी करून शेतकरी मेटाकुटीला आला आहे. कांद्यावर करपा, गव्हावर तांबेरा, ज्वारीवर चिकटा या रोगांसह किडींचा, अळीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव जाणवू लागला आहे. या सर्व परिस्थितीमुळे शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. दरम्यान, हवामानाच्या लहरीपणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम झाला आहे. खोकला, सर्दी व तापाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. त्यामुळे दवाखान्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे.
हवामानाचा हा लहरीपणा आणखी काही दिवस असणार आहे असे, हवामान खात्याने नोंदविलेल्या निरीक्षणानुसार सांगण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून तालुक्याच्या ग्रामीण भागात ढगाळ वातावरणामुळे पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांवर धमक्यांमुळे पुन्हा संकट आले आहे.