पुणे : पूर्व हवेलीतून जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या रिंग रोडच्या आखणीत तिसऱ्यांदा बदल केले आहेत. शिंदवणे आणि वळती गावात रिंगरोडची आखणी बदलल्याने शेतकऱ्यांना भूसंपादनासाठी नोटीस देऊन मोजणीची प्रक्रिया सुरू झाली आहे. पुणे-छत्रपती संभाजीनगर महामार्गाला केंद्रीय रस्ते वाहतूक व परिवहन मंत्रालयाने मंजुरी दिली नाही म्हणून एमएसआरडीसीकडून बदल करण्यात आले आहेत.
हवेलीतून सोलापूर रस्त्यामार्गे पुरंदर, शिवरीकडे जाणाऱ्या टप्प्यात एसएसआरडीसीकडून भूसंपादन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यापूर्वी तिनवेळा या ठिकाणी आखणीत बदल करुन शेतकऱ्यांना नोटीसा देऊन मोजणीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मात्र, आता पुन्हा एकदा या मार्गावर वळती व शिंदवणे या गावांत आखणीत बदल करण्यात आला आहे. त्यानुसार शेतकऱ्यांना भूसंपादनाच्या नोटीसा पाठवून मोजणीची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
या परिसरात एमएसआरडीसीकडून रिंगरोडसाठी पुणे-छत्रपती संभाजीनगर प्रस्तावित मार्गासाठी वळती व शिंदवणे या गावामध्ये वर्तुळाकार पध्दतीने महामार्ग एकमेकांना जोडले जाणार होते. मात्र, पुणे-छत्रपती संभाजीनगर महामार्गाला केंद्राकडून मंजुरी मिळाली नाही. त्यामुळे ही वर्तुळाकार जोडणीची रचना स्थापत्य विभागाने रद्द केल्याने या मार्गावरील साधारण पाचशे मीटर अंतरावर भूसंपादनात बदल करून अतिरिक्त भूसंपादन करण्यात येणार आहे.
पूर्व हवेलीमध्ये या टप्प्यात तिसऱ्यांदा बदल होत असताना भूसंपादन प्रक्रिया, हरकती नोटीसा व मिळकतींचे निवाडे अशा प्रक्रिया राबविण्यात आल्या आहेत. आता नव्याने या प्रक्रिया राबवावे लागणार आहेत. शिंदवणे व वळती या भागात एका मोठ्या संस्थेची जमीन व भारत पेट्रोलियमचा डक असल्याने आखणीत बदल करताना मोठा हस्तक्षेप झाला आहे. वळती परिसरात काही भूसंपादनात बागायती व जिरायती जमीन मूल्यांकनात तफावती आहेत. परत आता भूसंपादन प्रक्रिया सुरू झाल्याने शेतकऱ्यांची मंजूरी असूनही बदलत्या भूसंपादन धोरणाने शेतकरी चिंतेत आहे.