शिक्रापूर : सणसवाडी (ता. शिरूर) येथे तरुणांमध्ये आकर्षण ठरत असलेल्या गुंगीकरण पानाची विक्री करणाऱ्या पान दुकानांवर शिक्रापूर पोलिसांनी छापा टाकला. तसेच गौरव पांडुरंग खळदकर व चंद्रकांत बापू मोहिते या दोघांवर गुन्हे दाखल करत त्यांना अटक केली आहे.
सणसवाडी (ता. शिरूर) येथील मुख्य चौकात काही पान दुकानांमध्ये मानवी जीवितास धोका निर्माण करणारी पावडर पानामध्ये टाकून गुंगीकरण पान विक्री केली जात असल्याची माहिती पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांना मिळाली. त्यांनतर सहायक पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र पानसरे, पोलीस शिपाई जयराज देवकर, निखील रावडे यांनी सणसवाडी येथे जात सरदार पान शॉप व पाटील पान दरबार शॉप येथे छापा टाकला. त्यांना तेथे पानांमध्ये उग्र वासाची मानवी जीवितास धोका निर्माण करणारी पावडर टाकून विक्री केली जात असल्याचे निदर्शनास आले.
दरम्यान, पोलिसांनी दोन्ही ठिकाणांहून पावडर जप्त करत पान दुकानदारांना ताब्यात घेतले. तर, याबाबत पोलीस शिपाई जयराज वसंत देवकर (रा. शिक्रापूर ता. शिरुर) यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी सदर पान शॉपचे चालक गौरव पांडुरंगे खळदकर (वय २८, रा. बजरंगवाडी, शिक्रापूर) पान दरबार शॉपचे चालक चंद्रकांत बापू मोहिते (वय २८, रा. सणसवाडी, ता. शिरूर) या दोघांवर गुन्हे दाखल करत त्यांना अटक केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक केशव वाबळे हे करत आहेत.