शिक्रापूर, (पुणे): शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रिलायंन्स जिओ कंपनीच्या गोडाऊनमधील झालेल्या चोरीची उकल करण्यात शिक्रापूर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाला यश आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी 6 परप्रांतीय चोरट्यांना अटक केली असून त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेला टेम्पो, मोटारसायकल व चोरी केलेल्या 10 बॅटऱ्या असा 9 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
आलम युनुस मनीयार, (वय -34, रा. गायकवाड नगर, पुनवळे ता. हवेली) अनिल लखीराम गुप्ता (वय 39,सध्या रा.लक्ष्मीमाता मंदिर, भारतनगर, कत्तारवाडी, येरवडा), विरेंदर चरमसिंग जाटाव (वय-27, रा. गायकवाडनगर, पुनवळे, ता. हवेली मुळ रा. गडीवाधवा, ता. हिंडोनसीटी, जि. करोली, राज्य राजस्थान), विशाल पणू कश्यप (वय 19) शिवम बजरंगी कश्यप, (वय 22, रा. दोघेही सध्या मुंजाबावस्ती, विमान बिल्डींग शेजारी, श्रीहंसनगर धानोरी मुळ रा. मुलीयामऊ, कायतंगापुर्वा, ता. जि. रायबरेली, राज्य उत्तरप्रदेश) शामजी चिकनु यादव (वय 24, सध्या रा. गायकवाडनगर, पुनवळे, ता. हवेली, जि. पुणे. मुळ रा. तिरलोकपुर, ता.इटवा, जि. सिध्दार्थनगर, राज्य उत्तरप्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 4 एप्रिलला रात्रीच्या सुमारास अज्ञात आरोपीने रिलायंन्स जिओ इंन्फोकॉम लिमीटेड या कंपनीच्या पत्र्याच्या गोडाऊनची पाठीमागील भिंत फोडुन गोडावणात असलेले कॉपर केबल, केबल कनेक्टर, व 10 बॅटऱ्या असा 5 लाख 59 हजार 250 रुपयांचा मुद्देमाल चोरी झाला होता. याबाबत नितीन गोपाळा भोर यांनी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
सदर घटना गंभीर असल्याने तात्काळ चोरीचा शोध घेण्याच्या सुचना वरिष्ठांनी शिक्रापूर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाला दिल्या होत्या. सदर घटनेचा तपास गुन्हे शोध पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार करीत असताना शिक्रापूर, जातेगाव, सणसवाडी, कोरेगाव भिमा, लोणीकंद, वाघोली व पुढे शहर परीसरामध्ये गुन्ह्याचा तांत्रीक पध्दतीने तपास केला असता, सदरचा गुन्हा करण्यासाठी आरोपींनी एक लाल रंगाची युनिकॉर्न गाडी व एक टेम्पो वापरला असल्याची माहीती एका खबऱ्याकडून पोलिसांना मिळाली.
त्यानुसार पोलीसांनी आरोपींची माहीती काढुन गुन्ह्याच्या तपासामध्ये वरील आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याची कबुली पोलिसांना दिली. आरोपींकडुन चोरलेल्या मालापैकी 3 लाख रुपयांच्या 10 बॅटऱ्या तसेच गुन्हा करण्यासाठी वापरलेला 1 टेम्पो व 1 मोटार सायकल असा 9 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी वरील 6 आरोपींना अटक करण्यात आली असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार श्रीमंत होनमाने हे करीत आहेत.
सदरची कामगिरी शिक्रापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे, जितेंद्र पानसरे, पोलीस हवालदार श्रीमंत होनगाने, अमोल दांडगे, विकास पाटील, रोहीदास पारखे, शिवाजी चितारे, जयराज देवकर, अमोल नलगे यांचे पथकाने केली आहे.