पुणे : पुण्यात धक्कादायक घटना घडली आहे. सासुरवाडीला जात असताना वाटेत क्रिकेटचा सामना पहात थांबलेल्या मेव्हण्याला त्याच्या दाजीने तुला कोर्टात केस करायची हौस आहे ना, आज तुला दाखवतोच असे म्हणत हातातील क्रिकेटची बॅट डोक्यात घालून मेहुण्याला जबर जखमी केल्याची घटना समोर आली आहे. तेंव्हा इतरांनी आमच्या गावात का आला, असे म्हणून बेदम मारहाण केली. याप्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत नितीन शहाजी दळवी (वय 38, रा. कारेगाव, ता. शिरुर) यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारीवरून पोलिसांनी किरण बबनराव थिटे (रा. कान्हुर मेसाई, ता. शिरुर), राम भोकनळ, लखन भोकनळ, सत्यम खेडकर (रा. कान्हुर मेसाई, ता. शिरुर) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. यात नितीन दळवी हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर शिक्रापूर येथील सूर्या हॉस्पिटलमध्ये अति दक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांचे मित्र सागर मलगुंडे यांच्यासह 18 एप्रिल रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास सासुरवाडीला जात होते. वाटेत कान्हूर मेसाई गावाच्या हद्दीतील धामारी रोडच्या कडेला काही जण क्रिकेट खेळत होते. फिर्यादी यांनी कार थांबवली क्रिकेटचा सामना पहात थांबले. त्यानंतर सामना संपल्यावर त्यांचे दाजी किरण थिटे हे हातात क्रिकेटची बॅट घेऊन त्यांच्याकडे आले. राम भोकनळ या व्यक्तीने त्यांना शिवीगाळ करुन तू आमच्या गावात आलास कसा असे म्हणाले. तेंव्हा फिर्यादी यांनी मी क्रिकेट मॅच पाहण्यासाठी थांबलो आहे, असे सांगितले.
दरम्यान, किरण थिटे यांनी शिवीगाळ करुन तुला कोर्टात केस चालवायची जास्तच हौस आहे, तुला आज दाखवतोच, असे म्हणून हातातील बॅट त्यांच्या डोक्यात घातली. त्यानंतर त्यांच्या डोक्यातुन रक्त येऊ लागले. थिटे बरोबर असलेल्या भोकनळ, खेडकर यांनी त्यांच्या हातातल्या स्टंपने डोक्यात मारहाण केली. तेव्हा सागर मलगुंडे यांनी त्यांना थांबविले. तू परत या गावात दिसलास तर तुला सोडणार नाही अशी राम भोकनळ यांनी धमकी देऊन ते निघून गेले. त्यानंतर सागर यांनी नितीन दळवी यांना रुग्णालयात दाखल केले. पोलीस निरीक्षक गायकवाड तपास करीत आहेत.