योगेश शेंडगे
शिक्रापूर: शिरूर तालुक्यातील शिक्रापूर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी यांनी अति संवेदनशील गुन्ह्याचा तपास जलद गतीने करुन आरोपींना जेरबंद करत उत्तम कामगिरी केल्याबद्दल पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी व पुणे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्या हस्ते विशेष प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला आहे.
आरणगाव येथील दरोड्यातील आरोपींना केले जेरबंद
१८ मार्च २०२३ रोजी आरणगाव येथे दरोडेखोरांनी हल्ला करत चोरी केलेल्या घटनेत एका दांपत्याचा मृत्यू झाला होता. सदर गुन्ह्याचा तपास करून शिक्रापूर पोलिसांनी या गुन्ह्यातील दोन आरोपींना तातडीने अटक करत गुन्हा उघड करण्याचे काम केले. गुन्ह्याचा तपास सुरु असताना या गुन्ह्यातील आरोपी पारनेरमध्ये फिरत असल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांना मिळाली. त्यांनतर शिक्रापूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक केशव वाबळे व पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे यांसह पोलीस पथकाने पारनेर येथे जाऊन ज्ञानदेव तागड याला ताब्यात घेतले. तर रामदास काळे याला तळेगाव दाभाडे येथे जाऊन ताब्यात घेतले. पोलिसांच्या पथकाने रामदास अशोक काळे व ज्ञानदेव गोपाळ तागड (दोघे रा. रांजणगाव मस्जिद ता. पारनेर जि. अहमदनगर) या दोघांना अटक केली. त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी त्यांच्या आणखी तीन साथीदारांच्या मदतीने चोरी करताना दाम्पत्याने प्रतिकार केल्याने मारहाण केल्याचे कबुल केले.
या कामगिरीमुळे पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक केशव वाबळे, पोलीस हवालदार शिवाजी चितारे, जयराज देवकर, निखील रावडे यांचा कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या प्रसंगी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, संजय जाधव आदी उपस्थित होते.