शेलपिंपळगाव (पुणे) : खेड तालुक्यातील शेलपिंपळगाव येथील पोतलेमळा परिसरात गोळीबार झाला आहे. गाडीवर बसण्यासाठी जागा न दिल्याच्या कारणावरून एकाने जागा न देणाऱ्या व्यक्तीच्या घरासमोर येऊन गोळीबार केला. ही घटना गुरुवारी (दि.19) रात्रीच्या सुमारास घडली आहे.
याप्रकरणी संजय तानाजी वाघमारे (वय 40, रा. शेलपिंपळगाव. ता. खेड. मूळ रा. धाराशिव) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावेळी सचिन किसन मोहिते (वय -37, रा. पोतलेमळा, शेलपिंपळगाव ता. खेड) आणि दोन अनोळखी इसमांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संजय वाघमारे हे बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास त्यांचा मित्र गोरक्ष जाधव यांच्यासह दुचाकीवरून पिण्याच्या पाण्याचा जार घेऊन जात होते. त्यावेळी सचिन मोहिते याला गाडीवर बसण्यासाठी जागा दिली नाही, या कारणावरून त्याने फिर्यादी संजय वाघमारे यांना दमदाटी करून शिवीगाळ केली आणि त्यानंतर मारहाण केली.
सचिन मोहिते हा गुरुवारी मध्यरात्री साडेबारा वाजताच्या सुमारास फिर्यादी संजय वाघमारे यांच्या घरासमोर आला. ‘तुम्ही बाहेरून येऊन आमच्या गावात राहता. पैसे कमावता. येथे राहायचे असेल तर मला पैसे द्यावे लागतील’ असे म्हणत. त्याने शिवीगाळ केली आणि त्यानंतर जोरात आरडाओरडा केला. गुरुवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास पुन्हा फिर्यादी संजय वाघमारे यांच्या घरी येऊन दारू पिण्यासाठी दोन हजार रुपये मागितले. त्यावेळी जर पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकीही दिली.
गुरुवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास आरोपी सचिन मोहिते त्याच्या दोन मित्रांना घेऊन पुन्हा फिर्यादी संजय वाघमारे यांच्या घरी आला. बंदुकीसारखे शस्त्र घेऊन त्याने जोरजोराने ओरडून ‘घराच्या बाहेर ये, दुसरं कोणी आलं तर त्यालाही ठोकतो’ असे म्हणत बंदुकीतून दोन गोळ्या हवेत झाडल्या.
दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी सचिन मोहिते या व्यक्तीस अटक केली आहे.