पुणे : कुख्यात गुंड शरद मोहोळ खून प्रकरणाचा मुख्य सूत्रधार विठ्ठल शेलार याच्यासह साथीदार रामदास मारणे याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. शेलार आणि रामदास मारणेच्या पोलीस कोठडीची मुदत बुधवारी संपली. दोघांना न्यायालयात हजर करण्यात आले. फरारी असलेला दुसरा मुख्य सूत्रधार गणेश मारणे याचा शोध घ्यायचा आहे. गणेश मारणेने न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी अर्ज केला आहे.
शेलार आणि गणेश मारणे मुख्य सूत्रधार आहेत. शेलार आणि मारणे यांनी मोहोळचा खून होण्यापूर्वी एक महिना आधी बैठक घेतली होती. गणेश मारणे सापडल्यानंतर अनेक बाबी समोर येतील. तपासासाठी शेलार आणि रामदास मारणे यांना चार दिवस पोलीस कोठडी द्यावी, अशी विनंती तपास अधिकारी सहायक पोलीस आयुक्त सुनील तांबे यांनी केली.
आरोपींनी मोहोळचा खून करण्यापूर्वी गोळीबाराचा सराव कोठे केला, ही जागा शोधली आहे. पोलिसांनी वाहने जप्त केली आहेत, असे अॅड. इथापे-यादव यांनी युक्तिवादात सांगितले. दोन्ही बाजूंच्या युक्तिवादानंतर न्यायालयाने शेलार आणि रामदास मारणे यांना एक फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.