सागर जगदाळे
भिगवण : रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ व भिगवण रोटरी क्लब यांच्या वतीने देण्यात येणारा ‘रोटरी एक्सलन्स’ पुरस्कार भिगवण येथील प्रसिद्ध हॉटेल व्यवसायिक चंद्रशेखर देविदास पवार यांना देण्यात आला. अपार कष्ट, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर हॉटेल ज्योती मिसळ या नावाने संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये नावारूपाला आणले आणि त्या माध्यमातून भिगवणचे नाव संपूर्ण महाराष्ट्रात गाजवले. या यशाबद्दल पवार यांचा सन्मान करण्यात आला.
चंद्रशेखर पवार हे अतिशय गरीब कुटुंबात जन्मले. चहाच्या टपरीपासून त्यांनी कामाला सुरूवात केली. चहाची टपरी मालक विजय पुजारी यांनी पवार यांना टपरी चालवायला दिली. या संधीचा लाभ घेत पवार यांनी अपार कष्ट, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर हॉटेल ज्योती मिसळ या नावाने संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये मिसळ फेमस केली. ज्योती मिसळ सोबतच त्यांनी ज्योती व्हेज, ताराई मंगल कार्यालय असे वेगवेगळे व्यवसाय केले.
समाजाने त्यांना भरपूर दिले याचे भान ठेवून, त्यांनी भिगवण व पंचक्रोशीमध्ये गोरगरिबांना मदत करणे, स्मशानभूमी नूतनीकरण करणे, भैरवनाथ मंदिराची कमान उभारणे, मित्र बापूराव थोरात यांच्या मदतीने अंत्यविधीसाठी रथ उपलब्ध करणे, अशी विविध समाजोपयोगी कामे त्यांनी केली आहेत. या कार्याबद्दल रोटरी क्लब ऑफ भिगवण व रोटरी क्लब ऑफ पुणे डिस्ट्रिक्ट ३१३१ झाेन ३ यांच्यावतीने पुणे येथे त्यांना प्रांतपाल रो. नितीन ढमाले, रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ च्या वोकेशनल टीमचे डायरेक्टर रो. वसंतराव माळुंजकर, को-डायरेक्टर रो. शिरीष पुराणिक, एजी हनुमंत पाटील, रोटरी क्लब भिगवणचे अध्यक्ष रणजित भोंगळे, वोकेशनल डायरेक्टर प्रवीण वाघ, संस्थापक अध्यक्ष सचिन बोगावत यांच्या हस्ते देण्यात आला.
या वेळी नियोजित प्रांतपाल नितीन ढमाले यांनी रोटरीने विश्वातून पोलिओ निर्मूलनाचे जे काम केले आहे त्याचा आढावा घेतला. समाजकार्य करत असताना रोटरी सोबत येऊन काम करण्याचे आवाहन केले. यावेळी रोटरी क्लब भिगवणचे खजिनदार कुलदीप ननवरे, डायरेक्टर संजय रायसोनी, प्रदीप वाकसे, अल्ताफ शेख व योगेश चव्हाण व झोनमधील रोटरीयन्स उपस्थित होते.