राहुलकुमार अवचट
यवत : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर बंद स्थितीत असलेल्या टोल नाक्याचे अनावश्यक बांधकाम अपघाताला निमंत्रण देणारे आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने ते बांधकाम तत्काळ हटविण्याची मागणी प्रवासी, वाहतूकदार व नागरिकांमधून होताना दिसत आहे.
पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील लोणी काळभोर (कवडीपाट) व कासुर्डी येथे असलेल्या टोल नाक्यावरील टोल जमा करण्यासाठी उभारलेल्या चौकोनी शेडमुळे अपघातांना निमंत्रण मिळत आहे. सोमवारी (ता. १९) रात्रीच्या सुमारास कासुर्डी टोल नाका येथील पुण्यावरून सोलापूर दिशेने जाणाऱ्या मार्गावरील टोल नाक्यावरील बंद पडलेल्या एका शेडला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने शेड मुख्य मार्गावर आली. यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही शेड तत्काळ काढण्याची मागणी प्रवासी व वाहतूकदार करत आहेत.
पुणे-सोलापूर हा राष्ट्रीय महामार्ग असल्याने अनेक राज्यांना जोडणाऱ्या वाहतुकीसाठी सोयीस्कर मार्ग आहे. या महामार्गावर मोठ्या प्रमाणात प्रवासी व मालवाहतूक होत असते. टोल वसुली झाल्यानंतर अनेक वर्षांपासून हा टोलनाका सरकारच्या आदेशानुसार बंद करण्यात आला. मात्र, रस्त्याच्या मध्यभागी असलेले टोल वसुलीचे कार्यालय आजही बंद अवस्थेत ‘जैसे थे’ असून, वाहनांची मोठ्या प्रमाणात ये-जा असल्याने मध्यभागी असलेल्या टोल वसुलीच्या कार्यालयामुळे वाहनांना समोरील वाहने दिसत नाहीत. काही वाहने ओव्हरटेकच्या नादात थेट सुसाट जातात. बंद पडलेल्या टोल नाका परिसरातील अनावश्यक बांधकाम हे अपघातांना निमंत्रण देणारे आहे.
टोल नाका बंद झाल्याने ते बांधकाम निरुपयोगी असून, हे बांधकाम काढून रस्ता सुरळीत करण्यात यावा, जेणेकरून अपघाताचा धोका टळेल. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने संभाव्य धोका लक्षात घेऊन टोल वसुली कार्यालयाचे बांधकाम हटविण्याची मागणी प्रवासी, वाहतूकदार व नागरिकांकडून होत आहे.
कदमवाकवस्ती व कासुर्डी येथील टोलनाक्याची टोलवसुली मुदत ३१ मार्च २०१९ मध्ये संपली आहे. हा टोलनाका आजही बंद अवस्थेत आहे. पुणे-सोलापूर महामार्ग हा एनएचआयकडे वर्ग झाला आहे. अपघाताच्या घटना पाहता हा टोलनाका काढणे आवश्यक असल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे.