पिंपरी : मोबाईल दिला नाही, या किरकोळ कारणास्तव मित्रानेच घरात शिरून मैत्रिणीवर कोयत्याने वार केल्याची घटना काळेवाडी येथे सोमवारी दुपारी घडली. याप्रकरणी तरुणीने वाकड पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अविनाश शिवाजी लोखंडे (वय ३०, रा. गुळवे वस्ती, भोसरी) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी तरूणी तिच्या मावस बहिणीच्या घरी असताना आरोपी घरात घुसला. फिर्यादी मोबाईलवर बोलत असताना आरोपीने कोणाशी बोलत आहेस, म्हणून मोबाईल घेण्याचा प्रयत्न केला. या वेळी फिर्यादीने मोबाईल देण्यास नकार दिला. याचा राग मनात ठेवून आरोपीने त्याच्याजवळील कोयत्याने फिर्यादीच्या गळ्यावर वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
दोघांमध्ये वादावादी सुरू असताना तरूणीची मावस बहीण सोडविण्यास आली असता तिच्या गालावर कोयत्याने वार करत जखमी केल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेचा अधिक तपास फौजदार माने करीत आहेत.