बारामती, (पुणे) : बारामती लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी गावोगावी सुप्रिया सुळे तसेच पवार कुटुंबातील श्रीनिवास पवार, शर्मिला पवार, युगेंद्र पवार आणि रोहित पवार गावोगावी जावून नागरिकांच्या भेठी-गाठी घेत फिरत आहेत. त्यात शर्मिला पवार यांनी खावा कुणाचं बी मटण अन् दाबा फक्त तुतारीचं बटण, नाहीतर एक वाटी रस्सा अन् ५ वर्ष बोंबलत बस्सा, अशा गावरान भाषेत कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला आहे.
यावेळी शर्मिला पवार म्हणाल्या की, आम्ही कित्येक वर्षापासून बारामतीमध्ये प्रचार करत आहे. प्रत्येकवेळी तुम्हाला आमिष दाखवले जाईल असं म्हणतो. मटण, बोकड, जेवायला या सगळे सांगतील. खावा कुणाचं बी मटण, दाबा फक्त तुतारीचं बटण, नाहीतर एक वाटी रस्सा अन् ५ वर्ष बोंबलत बस्सा अशा गावरान भाषेत शर्मिला पवार यांनी कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला.
तसेच पुढे बोलताना म्हणाल्या, वडिलांची पुण्याई सुप्रिया सुळेंच्या पाठिशी असणार आहे. मात्र, त्यांनी कधीही पवार नावाचा वापर स्वत:च्या कामासाठी केला नाही. त्यांना निवडून द्यायचं की नाही, हा अधिकार तुमचा आहे. जनता सुज्ञ आहे. आज काय घडतंय ते तुम्हाला माहिती आहे. आज मुखाने श्रीराम म्हणतोय, पण घराघरात रामायण सुरू आहे की महाभारत, अनोळखी व्यक्तीला मतदान करण्यापेक्षा जो आपल्या माहितीतला उमेदवार आहे. जी लेक माहेरवाशीण आहे तिला पुन्हा एकदा संधी द्यावी असं आवाहन शर्मिला पवार यांनी बारामतीकरांना केले आहे.
मग नव्याला संधी कशाला…
दरम्यान, तुतारी फुंकणारा माणूस हे सुप्रियाताईंचे चिन्ह आहे. जे तुमचे बहुमूल्य मत आहे, ते सुप्रिया सुळे आणि साहेबांना देऊन विजयी करायचे आहे. सुप्रिया सुळेंना पुन्हा एकदा संसदेत पाठवायचे आहे. संसदेत तुम्हाला बोलावेच लागते, भाषण करावेच लागते. तुम्हाला लोकांच्या समस्या मुद्देसूद मांडाव्या लागतात. जर ते काम सुप्रिया सुळे चांगले करत असतील. तर नव्याला संधी कशाला. असा मुद्दा उपस्थित केला आहे.
सुप्रिया सुळे पुन्हा एकदा बारामतीच्या खासदार
पवार साहेब आजपर्यंत एकही निवडणूक हरले नाहीत. मग आता त्या व्यक्तीला हरवायचं का? ते पाप आपण घ्यायचे का? जर आपण दुसऱ्याला मत दिले तर पुन्हा पश्चाताप होईल. एकदा निर्णय घेतला की घेतला. त्यामुळे ४ जूनला सुप्रिया सुळे पुन्हा एकदा बारामतीच्या खासदार झाल्या आहेत, अशी गोड बातमी आपल्या सगळ्यांच्या कानावर येणार आहे असा विश्वास शर्मिला पवार यांनी व्यक्त केला आहे.