यवत : सहजपुर येथील शारदा विद्यालयात २० वर्षांनी माजी विद्यार्थ्यांचा वर्ग भरला. यावेळी सहजपुर येथील माजी विद्यार्थी स्नेह मेळावा मोठ्या आनंद उत्साहात पार पडला. शारदा विद्यालय सहजपूर (ता दौंड) वर्ष २००४ ते २००५ च्या माजी विद्यार्थी यांचा स्नेह मेळावा बुधवार, (दि. 8) रोजी पार पडला.
माजी विद्यार्थी हे शिक्षणासाठी, कामानिमित्त बाहेर गावी गेलेल्यांसाठी तसेच अशा अनेक कारणास्तव बरेच लोक घर, शहर, नातेवाईक आणि मित्रांपासून दुरावतात त्यांना भेटण्यासाठी विशेष वेळ काढण्यासाठी गरज भासते आणि मग सर्वांना एकदाच भेटता यावे यासाठी खटाटोप सुरू होतो. यावेळी माजी विद्यार्थी स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात होणार असल्याची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.
नातलगांपैकी बरीच मंडळी बाहेरगावी किंवा स्थायिक झालेली असल्याने घरातील एखाद्या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांनी भेट होत असते. पण बऱ्याचदा या सगळ्या गडबडीत पोटभर गप्पागोष्टी, एकमेकांची चौकशी, जुन्या आठवणी या सगळ्यांना पुरेसा वेळ देणे शक्य होत नाही. त्यामुळेच स्नेहसंमेलनाचे आयोजन केले होते. वीस वर्षानंतर सर्वांना पुन्हा एकदा भेटण्याची, हितगुज करण्याची संधी मिळाल्याने आनंदी व उत्साही वातावरण निर्माण झाले होते.
यावेळी शिक्षक म्हणून पुरुषोत्तम मुरकुटे, विकास कदम यांचा सत्कार करण्यात आला. शिक्षकांच्या कौतुकाने सर्व विद्यार्थी भारावून गेले. माजी न म्हणता ‘माझे शिक्षक माझे विद्यार्थी’ अशा बोधवाक्याने सर्वांनी एकमेकांची मने जिंकली. माजी विद्यार्थी यांनी उत्स्फूर्तपणे व्यवस्थापकाची भूमिका निभावली. असेच भेटत राहू, अशी एकमेकांना ग्वाही देत जड पावलाने स्नेहपूर्ण निरोप घेत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.