पुणे : राज्यात लोकसभेच्या ११ मतदार संघांसाठी आज मतदान होत आहे. सकाळपासूनच नागरिकांनी घराबाहेर पडून मतदानाचा हक्क बजवायला सुरुवात केली आहे. अशातच आता ऐन मतदानाच्या दिवशीच दिलीप वळसे पाटील यांनी मोठं विधान केलं आहे. शरद पवार यांना या निवडणुकीत सहानुभूतीची लाट मिळेल, असं विधान अजितदादा गटाचे नेते दिलीप वळसे पाटील यांनी केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. वळसे पाटील यांनी आज प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.
दिलीप वळसे पाटील म्हणाले, तब्येतीच्या कारणाने सक्रिय प्रचारात सहभागी होता आलं नाही याची खंत आहे, असं सांगतानाच लोकसभा निवडणूक देशाच्या मुद्द्यांवर लढली जाते. पण यंदा पहिल्यांदाच याने काय म्हटले आणि त्याने काय म्हटले यावर ही निवडणूक लढवली जात आहे. शरद पवार यांना या निवडणुकीत सहानुभूतीची लाट मिळेल, असं दिलीप वळसे पाटील म्हणाले.
तरुणाईला शरद पवारांची भुरळ
पुढे बोलताना म्हणाले, शिरुर लोकसभा मतदारसंघात पहिल्यांदा मतदान करणा-या तरुणाईची संख्या लक्षणीय असुन देशाच्या निवडणूकीत तरुणाईला शरद पवारांची भुरळ पडल्याचे दिसत आहे. शरद पवारांनी उभारलेले प्रकल्प, रोजगारनिर्मिती शिक्षणाचे उभे केलेले सक्षम पर्यायामुळे तरुणाईला शरद पवारांची भुरळ पडली असून अनेक युवा मतदारांनी तुतारीला पसंती दर्शवल्याचे दिसत आहे, असं वळसे पाटील म्हणाले.
भारतासारख्या देशात राज्यघटनेने आपल्याला अधिकार दिला आहे. नागरिकांनी सजग राहून हा अधिकार बजावला पाहिजे. आपल्या आवडीचं आणि देशाचं हित करणारं सरकार आलं पाहिजे. मी आवाहन करतो की, सर्व नागरिकांनी, तरुणांनी भरभरून मतदान करावं, असं आवाहन दिलीप वळसे पाटील यांनी यावेळी केलं.