बारामती : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामतीमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांच्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी विविध मेळाव्यांचे आयोजन केले होते. डॉक्टर व वकीलांसोबतच व्यापाऱ्यांचाही मेळावा नियोजित होता. मात्र, ऐनवेळेस व्यापारी वर्गाने मेळावा घेणे शक्य नसल्याचे पत्र शरद पवार यांना दिल्यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे. शहरातील व्यापाऱ्यांवर कोणाचा दबाव आहे, हे माहिती नाही. गेल्या ५० वर्षांत असे कधीच घडले नाही, असे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी नमूद केले आहे. व्यापारी मेळावा रद्द व्हावा, ही बाब दुर्दैवी आहे, असे म्हणत त्यांनी खेद व्यक्त केला.
बारामतीत सुप्रिया सुळे यांच्यासाठी या मेळाव्यांचे आयोजन केले होते. त्यात डॉक्टर व वकीलांसमवेतच व्यापाऱ्यांचाही मेळावा नियोजित होता. मात्र, ऐनवेळेस व्यापारी वर्गाने मेळावा घेणे शक्य नसल्याचे पत्र शरद पवार यांना दिले. दरम्यान, बारामतीत झालेल्या वकिलांच्या मेळाव्यात बोलताना शरद पवार यांनी ही बाब बोलून दाखवली.
शरद पवार म्हणाले की, बारामतीतील व्यापाऱ्यांना नेमकी कशाची चिंता वाटते आहे, हे समजत नाही. आजवर व्यापाऱ्यांचे प्रश्न मी सोडवलेले आहेत. आज अचानकच मेळावा रद्द झाल्याचे पत्र मला दिले गेले. गेल्या ५० वर्षांत असे कधीच घडले नाही. त्यांना कसलीतरी चिंता वाटत असावी व मेळावा न घेतलेलाच बरा, असेही वाटले असावे. व्यापारी मंडळींनी समोरच्यांचे ऐकूनच घ्यायचे नाही असे ठरवले, याचा खेद वाटतो, असेही शरद पवार यांनी नमूद केले.
दरम्यान, दरवर्षी दिवाळीच्या पाडव्याला शरद पवार यांना बारामती व्यापारी सन्मानाने त्यांचे आगामी वर्षांचे आडाखे व बाजारपेठेची स्थिती यांची माहिती घेण्यासाठी आवर्जून बोलावत होते. आताच असे काय घडले, की शरद पवारांना नकाराचे पत्र मिळाले, याची चर्चा बारामतीत रंगली आहे.