बारामती : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे रविवारी (दि. ०८) मारकडवाडी येथे सकाळी साडेनऊ वाजता हेलिकॉप्टरने येणार आहेत. ईव्हीएम विरोधातील देशात मारकडवाडी हे पहिले गाव होते ज्याने बॅलेट पेपरवर मतदान घेण्यासाठी आंदोलन केले होते. याच ठिकाणी राहुल गांधींसह इंडिया आघाडीचे नेतेही लवकरच भेट देणार आहेत.
तर शरद पवार हे पहिल्यांदाच मारकडवाडी येथे येणार आहेत. माळशिरसचे आमदार आणि या आंदोलनाचे नेते उत्तमराव जानकर यांचा शपथविधी देखील रविवारीच होणार होता. मात्र, त्यांनी आता अध्यक्षांची परवानगी घेऊन सोमवारी अध्यक्षांच्या दालनात शपथ घेण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे.
सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी हे गाव राज्यभर चांगलंच चर्चेत आलं आहे. या गावातील नागरिकांनी बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी केली होती. यासाठी आंदोलन देखील करण्यात आली आहेत. ग्रामस्थांनी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची संपूर्ण तयारी केली होती. मात्र, पोलीस प्रशासनाने गावात जमावबंदी आदेश लागू करत ही मतदान प्रक्रिया रद्द केली. त्यामुळं ग्रामस्थांना बॅलेट पेपरवरील इच्छा मतदान घेताच आले नाही. मात्र, या गावाची सध्या जोरदार चर्चा होत आहे.
मारकडवाडीतील अनेक ग्रामस्थांवर गुन्हा दाखल
बॅलेट पेपरवरील मतदान प्रक्रियेसाठी पुढाकार घेणाऱ्या मारकडवाडीतील 17 जणांसह अन्य 100 ते 200 ग्रामस्थांच्या विरोधात नातेपुते पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालावर परिणाम करण्याच्या उद्देशाने ईव्हीएम मशीन संदर्भात अफवा पसरवून फेर मतदानाची तरतूद नसताना प्रशासनाचे आदेश डावलल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीएनएस 353(1) (ब), 189 (1), (2), 190, 223 सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम 135 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.