बारामती: सातारा लोकसभेसाठी आमच्या अध्यक्षांनी उमेदवार जाहीर केला आहे. माथाडी कामगारांसाठी काम करणाऱ्या आमदार शशिकांत शिंदे यांना पक्षाने संधी दिली आहे. एका बाजूला राजा आणि दुसऱ्या बाजूला सर्वसामान्य कुटुंबातील सामान्य कार्यकर्ता, असा सामना साताऱ्यात होणार आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे. शुक्रवारी खासदार शरद पवारांनी बारामतीतील माळेगाव येथे पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, अकलूजमधील अनेक सहकारी आपल्याला भेटायला आले. त्यामध्ये धैर्यशील मोहिते पाटील यांचे नाव पुढे आलं. आमच्या पक्षाचे अध्यक्ष अकलूजमध्ये त्यांना प्रवेश देतील. एकदा पक्षप्रवेश झाल्यानंतर धैर्यशील मोहिते यांची उमेदवारी जाहीर होणार आहे. या सबंध माढा मतदारसंघामध्ये तरुणांचा मोठा पाठिंबा दिसत आहे. आम्ही लवकरात लवकर पक्षाचा उमेदवार जाहीर करू, असं देखील शरद पवारांनी म्हटलं आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघातील दौंडच्या नामदेव ताकवणे यांनी आमच्या सोबत काम करण्याचा निर्णय घेतला, त्याचा आम्हाला आनंद आहे. भारतीय जनता पक्षाचे एका जिल्ह्याचे अध्यक्ष हे आमच्या पक्षात येऊन सर्वसामान्य लोकांसाठी काम करण्यास तयार आहेत, असंही शरद पवार यांनी सांगितले.