बारामती: जन्मानं दिलेली जात मी लपवत नाही, संपूर्ण जगाला माहितीय माझी जात काय आहे, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार (sharad Pawar) यांनी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या खोट्या जातीच्या दाखल्याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. तसेच मराठा आरक्षणाबाबत बोलताना मराठा तरुणांची भावना तीव्र, त्यांच्याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही, असं देखील शरद पवार म्हणाले. आज बारामतीतील दिवाळी पाडव्याचा गोविंदबागेतील कार्यक्रम आटोपल्यानंतर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी ते बोलत होते.
खासदार शरद पवार म्हणाले की, “गेली 50 वर्षांपासूनची पद्धत् आहे. दिवाळी पाडव्याच्या दिवशी लोक बारामतीत येतात. गेल्या काही वर्षांत त्यात मोठी वाढ झाली आहे. यंदाचं वर्ष थोडं वेगळं आहे. कारण यापूर्वी लोक पाडव्याच्या दिवशी यायचे, आता पाडव्यापूर्वी लोक येतात आणि सांगतात पाडव्याच्या दिवशी गर्दी खूप असते, त्यामुळे आम्ही आधीच येऊन भेटून जातो. दोन दिवस आधीही काही लोक येतात. पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मुंबई, कोकण आणि विदर्भ येथून लोक आले आणि शुभेच्छा दिल्या. यावर्षी आलेलयांपैकी 70 टक्के लोक तरुण होते. हे या वेळचं वेगळं वैशिष्ट्य. तरुणांच्या भवितव्यासाठी काय करता येईल त्याचा प्रयत्न मी करेन.”
मराठा आरक्षणाबाबतही शरद पवारांनी यावेळी भाष्य केलं आहे. मराठा तरुणांची भावना ही तीव्र आहे. त्यांच्याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही, लोकांच्या भावना सरकारपर्यंत पोहचवण्याचं काम आम्ही करू, असं म्हणत शरद पवारांनी मराठा समाजाला आश्वासन दिलं आहे. पुढे बोलताना मराठा आणि ओबीसीत वाद नाही, मात्र काही लोक तसं वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच, मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती, त्या बैठकीला राज्यातील विविध पक्षांचे प्रमुख नेते होते. आरक्षणाच्या पुर्ततेची प्रक्रिया पुर्ण करतो, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले असल्याचंही शरद पवारांनी यावेळी बोलताना सांगितलं.
माझी जात सगळ्या जगाला माहिती
काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या जातीचा खोटा दाखला सोशल माध्यमांवर व्हायरल झाला होता. याबाबतही शरद पवारांनी भाष्य केलं. ते म्हणाले की, “माझा जातीचा खोटा दाखला व्हायरल झाला होता. माझा इंग्रजीमधील दाखला काही जणांनी सर्वत्र फिरवला. त्या दाखल्यावर ओबीसी लिहलं होतं. जन्मानं दिलेली जात मी कधी लपवत नाही. संपूर्ण जगाला माहितीय आहे, माझी जात काय आहे.”
दरम्यान, आज बारामतीतील शरद पवारांच्या गोविंद बागेत दिवाळी पाडवा पार पडला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर गोविंद बागेत पहिलाच दिवाळी पाडवा पार पडला. खासदार शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडून शुभेच्छांचा स्वीकार करण्यात आला.