पुणे : पुणे शहर आणि परिसरात कोयता गँगची दहशत वाढल्याचे दिसत आहे. कोयत्याने हल्ले केल्याच्या अनेक घटना शहरात सतत घडत असतात. अशातच आता शरद पवारांनी महायुती सरकारचा चांगलाच समाचार घेतला आहे. टेल्को, बजाज, किर्लोस्करांचे कारखाने हे पुण्याचे वैशिष्ट्य आणि आजच्या राज्यकर्त्यांनी पुण्याचे वैशिष्ट्य काय केले? कोयता गँग, असा सवाल शरद पवार यांनी उपस्थित केला आहे.
पुण्यातील खराडी येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या सभेत शरद पवार बोलत होते. यावेळी त्यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. दरम्यान, या सभेत माजी आमदार बापूसाहेब पठारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश केला.
काय म्हणाले शरद पवार
आज ज्यांच्या हातात सत्ता आहे, त्यांनी पुण्यासाठी काय केलं? मी देशाच्या कामासाठी दिल्लीला जातो, पार्लमेंटचा सभासद आहे, म्हणून दिल्लीला जातो. महाराष्ट्राची वर्तमानपत्र मागवून घेतो, टीव्ही लावतो तर काय बघायला मिळते? पुण्याची चौकशी केली तर लोक सांगतात पुण्याचे वैशिष्ट्य काय तर कोयता गँग. आजच्या राज्यकर्त्यांनी पुण्याचे वैशिष्ट्य काय केले? असा प्रश्न शरद पवार यांनी उपस्थित केला.
शरद पवार म्हणाले, मला जर कोणी विचारले आजची पिढी काय करते, मला माहीत नाही. कसल्या तरी गोळ्या असतात त्या खाल्ल्या की एकदम चंद्रावर गेल्यासारखे वाटते आणि ते चंद्रावर जाण्याचा उद्योग आज पुणे शहरामध्ये व्हायला लागला आहे. आजचे राज्यकर्ते कोयता गँग, ड्रग्स व्यवहार असो याचा विस्तार पुणे आणि पुण्याच्या आजूबाजूला करत आहेत. यामुळे पुण्याची नवी पिढी ही उद्ध्वस्त होणार या प्रकारचे चित्र या ठिकाणी दिसत असून हा प्रकार दिवसेंदिवस वाढतच चालला आहे.
आमदार सुनील टिंगरे यांच्यावर जोरदार टीका
पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, मध्यंतरी वाचले एक आमदार अशा कामांमध्ये वेगळ्या पद्धतीने लोकांना मदत करतो. आता मी येताना बघितले मोठे मोठे बोर्ड लागले होते. आमचा दमदार आमदार, काय दमदार आहे? चौकशी केली की हा आमदार दमदार आहे, म्हणून काय भानगड आहे? नाव काय त्याचे? टिंगरे. अरे बाबा तू कोणाच्या तिकिटावर निवडून आला, त्यावेळेला तुझ्या पक्षाचा नेता कोण होता? त्या वेळेला हा पक्ष कोणी काढला? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना कोणी केली? संबंध हिंदुस्थानला माहीत असलेल्या या पक्षाच्या वतीने तुला काम करण्याची संधी दिली, अशी टीका सुनील टिंगरे यांच्यावर केली.
मदत करायची सोडून हा दिवटा पोलिस स्टेशनला जातो
पुढे म्हणाले, तू सोडून गेला ठीक आहे, तुझा काय बंदोबस्त करायचा हे लोक करतील त्याची चिंता नाही. मात्र, चुकीच्या गोष्टींना पाठिंबा देऊ नको. प्रचंड मोठा अपघात झाला. दोन तरुण मुले एका इंपोर्टेड गाडीतून जातात आणि समोरून स्कूटीवर दोन तरुण मुलगा मुलगी जात असताना त्यांना उडवले काय, जागच्या जागी त्यांची हात्या काय होते? उद्ध्वस्त होतात आणि अशा वेळेला जखमी झालेल्यांना मदत करायची सोडून हा दिवटा पोलिस स्टेशनला जातो. यासाठी मत मागितली होती? असा सवाल शरद पवार यांनी आमदार सुनील टिंगरे यांना केला आहे.
महाराष्ट्राचा चेहरा आम्हाला बदलायचाय : शरद पवार
महाराष्ट्राचा चेहरा आम्हाला बदलायचाय. आता एकनाथ शिंदे साहेबांचं राज्य आहे. त्याच्या आधी देवेंद्र फडणवीस याचं राज्य होतं. काय केलं यांच्या राजवटीत? मी स्वतः तुम्हा लोकांच्या पाठिंब्याने चार वेळा राज्याचा मुख्यमंत्री झालो होतो. आमचे अनेक सहकारी मंत्रिमंडळामध्ये होते. सत्तेचा वापर राज्याचा चेहरा बदलण्यासाठी करायचा असतो हे आम्ही दाखवलं, असंही शरद पवार यावेळी म्हणाले.