बारामती: फक्त राज्यातील नाही तर संपूर्ण देशाचे लक्ष बारामती लोकसभा निवडणुकीकडे लागले आहे. बारामतीमध्ये पवार कुटुंबातीलच दोन उमेदवारांमध्ये लढत होणार आहे. नणंद-भावजय अशी ही लढत होईल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये बंडखोरी करुन वेगळी वाट धरलेले अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि शरद पवार यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात सर्व पवार कुटुंब उभे राहिले आहेत. अजित पवार यांचे सख्ये बंधू श्रीनिवास पवार त्यांच्या विरोधात गेले आहे. श्रीनिवास पवार यांनी अजित पवार यांच्यावर कठोर शब्दांत टीका देखील केली होती. परंतु, या संकटकाळात खासदार शरद पवार यांचे सावत्र थोरले भाऊ अजित पवार यांच्या मदतीला धावून आले आहेत. त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आपला पाठींबा दर्शवला आहे.
एकीकडे अजित पवार यांच्या सख्या भावासह आणि इतर लोकांनी साथ सोडली. परंतु, आता शरद पवार यांचे सावत्र थोरले बंधू अजित पवार यांच्या सोबत उभे राहिले आहे. त्यांनी आपल्या घरावर बोर्ड लावत अजित पवार आणि सुनेत्रा पवार हेच आमचे कुटुंब असल्याचे म्हटले आहे. बारामतीमधील काटेवाडीतील शरद पवार यांचे थोरले सावत्र बंधू पांडुरंग पवार यांनी अजित पवार यांना साथ देणार आहेत. पांडुरंग पवार कुटुंब पूर्ण ताकतीने अजित पवार यांच्या बरोबर उभे राहून प्रचार करणार आहेत.