राहुलकुमार अवचट
यवत, (पुणे) : राजकारणासाठी गोरगरिबांना त्रास, धमकी देत असाल तर ज्या गावच्या बोरी त्या गावच्या बाभळी असतात हे लक्षात ठेवा, असा सज्जड इशारा शरद पवार यांनी वरवंड येथील सभेत दिला आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातील महाआघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ दौंड तालुक्यातील वरवंड येथे विराट सांगता सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शरद पवार यांनी बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला.
पुढे म्हणाले, बऱ्याच दिवसांनी आज येथे आलो असून माझे जुने सहकारी आता हयात नाहीत, परंतु तुम्ही मोठ्या संख्येने उपस्थित आहात. माझा आणि दौंडचा जुना संबंध आहे. मी शाळेत शिकत असताना भाजीपाला विकण्यासाठी रविवारी दौंडच्या बाजारात येत होतो. १९८४ मध्ये लोकसभा लढवली. तसेच १९६८ साली मी पहिल्यांदा विधानसभेसाठी उभा राहिलो. त्यावेळी दौंडकरांनी मला मदत केली, असं शरद पवार म्हणाले.
ज्या गावच्या बोरी, त्याच गावच्या बाभळी : शरद पवार
राजकारण करा पण कुणी राजकारण करण्यासाठी गरीब जनतेला त्रास देत असाल तर ज्या गावच्या बोरी, त्याच गावच्या बाभळी असतात हे लक्षात ठेवा, असा इशारा देखील शरद पवार यांनी दिला. वरवंड येथील सभेला शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही जोरदार निशाणा साधला.
अजित पवारांची दादागिरी संपली : भास्कर जाधव
राज्यात अडीच वर्षांपूर्वी शिवसेनेबरोबर गद्दारी केली. त्यानंतर राष्ट्रवादी पक्ष भाजपने फोडले. महाराष्ट्रात किमान ३५ जागा महाविकास आघाडीला मिळतील अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. तिकडे गेल्यापासून दादांची दादागिरी संपली असून फक्त दादा राहिले आहेत, दादागिरी कधीच निघून गेली, आता फक्त एकच काम करावं लागतं. दिल्लीतील गब्बर सिंग यांच्यापुढे जावे लागत आहे. अशी टीका शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी अजित पवार यांच्यावर केली.
शरद पवार यांनी आपले संपूर्ण आयुष्य गोरगरीब जनतेच्या सेवेसाठी घालवले. ४ जूनला मतमोजणी होईल त्यावेळेला या देशांमध्ये इंडिया विकास आघाडीचे सरकार येईल. गेले सतरा वर्ष सुप्रिया सुळे यांनी संसदेमध्ये लोकांचे विचारले प्रश्न विचारले मात्र, आता उत्तर देणाऱ्या मंत्री म्हणून बघायच आहे, त्यामुळे सुप्रिया सुळे यांना पुन्हा एकदा भरघोस मतांनी निवडून द्या, असं आवाहन भास्कर जाधव यांनी केले.