बारामती : राज्यात सद्या मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पेट घेत आहे. त्यावर आता शरद पवार यांनी भाष्य केल आहे. बारामतीमध्ये पत्रकार परिषद पार पडली तेव्हा शरद पवार मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाबाबत बोलले. त्यांनी आरक्षणाबाबत केंद्र सरकारने लक्ष घालण्याची गरज असल्याचे म्हटले आहे.
आरक्षणाबाबत शरद पवार यांनी मराठा आणि ओबीसी आरक्षण हे दोन्ही मुद्दे निकालात काढण्यासाठी केंद्र सरकारने हस्तक्षेप करावा, असे मत व्यक्त केले आहे. केंद्र सरकारने केवळ बघ्याची भूमिका घेऊन चालणार नाही. केंद्र सरकारने पुढे येऊन या सगळ्यावर उपाय शोधला पाहिजे, असे शरद पवार यांनी म्हटले. ते बारामतीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
दरम्यान, शरद पवार यांना मराठा आरक्षण आंदोलन आणि ओबीसी आरक्षण आंदोलनाने घेतलेला पेट आणि त्यामुळे बिघडत जाणाऱ्या वातावरणाबाबत विचारण्यात आले. त्यावर शरद पवार यांनी म्हटले की, या सगळ्याचं सोल्यूशन एकच आहे. ते म्हणजे केंद्र सरकारने याचा खुलासा घेतला पाहिजे. काही ठिकाणी कायद्यात बदल करावा लागेल. काही ठिकाणी केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या धोरणात बदल करावे लागतील, असे शरद पवार यांनी म्हटले.
मराठा आणि ओबीसी समाजातील लोकांच्या ज्या मागण्या आहेत, त्यासंबंधी मार्ग काढायला केंद्र सरकारने पुढाकार घेण्याची गजर आहे. राज्य आणि केंद्र सरकारने एका मर्यादेबाहेर आंदोलन जाणार नाही, याची काळजी घ्यावी. सामाजिक तणाव निर्माण होणार नाही, याची काळजी घेणे ही आपल्या सर्वांची जबाबादारी आहे. आम्ही इथे राजकारण आणू इच्छित नाही. पण इथे केंद्राला बघ्याची भूमिका घेऊन चालणार नाही. केंद्र सरकारने दोनही बाजूच्या प्रश्नात लक्ष घालून तोडगा काढायला हवा. असे शरद पवार यांनी म्हटले.