बारामती : बारामती लोकसभा मतदारसंघात शरद पवारच बॉस हे लोकसभा निवडणुकीने सर्वांना दाखवलं आहे. सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार यांचा मोठ्या मधाधिक्याने पराभव केला. लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांना चितपट केल्यानंतर शरद पवार यांनी आता आगामी विधानसभा निवडणुकीतही त्यांना शह देण्याच्या तयारीला सुरवात केली आहे, त्याचा भाग म्हणून शरद पवार आजपासून तीन दिवस बारामती तालुका पालथा करणार आहेत. निंबुत या गावापासून शरद पवार यांच्या तीन दिवसीय दौऱ्याची सुरुवात होणार आहे. त्यांच्या दौऱ्यात युगेंद्र पवार सुद्धा सहभागी होणार आहेत.
दरम्यान, मागच्या आठवड्यातच शरद पवार यांनी बारामती लोकसभा मतदार संघातील चार मतदार संघाचा दौरा केला होता. आता मात्र ते संपूर्ण तालुका पिंजून काढणार असल्याची माहिती आहे. अशातच, विधानसभा निवडणुकांपूर्वी थोरले पवार अजितदादांना मोठा शह देण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
बारामती हा शरद पवार यांचा बालेकिल्ला राहिला आहे. देश बारामतीला शरद पवार यांच्या ओळखतो. शरद पवारांनी आपल्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात बारामतीतून केली होती. पण काही काळानंतर शरद पवारांनी बारामतीची सारी सूत्रे अजित पवार यांच्याकडे सोपविली होती. आज परिस्थिती वेगळी आहे. राष्ट्रवादीत फूट पडली असून राष्ट्रवादीत दोन गट पडले आहेत. त्यामुळे शरद पवार विरुद्ध अजित पवार असा सरळ संघर्ष उभा राहिला आहे. अशातच आगामी विधानसभा हि दोन्ही पवारांसाठी अस्तित्वाची लढाई ठरणार आहे. त्यात कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
शरद पवार पुन्हा मैदानात..
काही वर्षांपूर्वी शरद पवार यांनी बारामतीचा सर्व कारभार अजित पवार यांच्याकडे सोपवला होता. त्यानंतर शरद पवार कधीच असा बारामतीचा भाग उलथवून काढला नव्हता. अशा प्रकारची माहिती राजकीय विश्लेषक सांगतात. मात्र, आता शरद पवार पुन्हा मैदानात उतरले आहेत. त्यामुळे अजित पवारांच्या समोर शरद पवारांचं विधानसभेला मोठं आव्हान असणार आहे.