पुणे : सध्या महाराष्ट्राचं (Maharashtra) राजकारण आणि लोकसभेची निवडणूक (Lok Sabha election) हे अनेकांच्या अस्मितेची लढाई झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांची (Sharad Pawar) बारामतीमध्ये सांगता सभा पार पडल्यानंतर शरद पवारांच्या प्रकृतीमध्ये बिघाड झाल्याची माहिती समोर आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे आजचे सर्वच कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. प्रचारासाठी गेल्या 20 दिवसांपासून ते स्वत:ला झोकून देऊन काम करत होते. तसेच राज्यातील अनेक जिल्ह्यामध्ये त्यांनी जाहीर सभेदरम्यान जनतेला संबोधित केले. या प्रचारामळे त्यांचा घसा बसला असून प्रकृती अस्वस्थेमुळे त्यांना आराम करण्यासाठी सांगितलं आहे. यावेळी त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी सांगितलं आहे. दरम्यान, त्यांचे आज बीडमधील दौरेही रद्द करण्यात आले आहेत. त्यानंतर, बीडमधील (Beed) महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी फेसबुक पोस्ट लिहून शरद पवारांना तब्येतीला जपा असे आवाहन केलं आहे.
शरद पवार हे लोकसभा निवडणुकांची घोषणा झाल्यापासून बैठका आणि सभांचे नियोजन करण्यात व्यस्त होते. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांसोबत त्यांचे चांगले संबंध असल्याने काँग्रेसची समजूत घालण्याचे किंवा महाविकास आघाडीत सुवर्णमध्य साधण्याचं कामही शरद पवारांनीच केले आहे. तर, लोकसभा निवडणुकांच्या उमेदवारांच्या प्रचारसाठी ते पहिल्या टप्प्यापासून कामाला लागले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या फुटीनंतर ते अधिक सक्रीय झाले. अजित पवारांच्या राष्ट्रवादीला टक्कर देण्यासाठी स्वत: लोकसभेच्या मैदानात उतरले. गेल्या काही दिवसांपूर्वी अहमदनगर जिल्ह्यात निलेश लंके यांच्या प्रचारासाठी गेल्यानंतर त्यांनी आपला घसा बसल्याचे सांगितले होते. तरीही त्यांनी पुढे अनेक ठिकाणी सभा केल्या आहेत.
या निवडणूक दौऱ्यांचा व सभांचा ताण पडल्याने त्यांची प्रकृती अस्वस्थ झाल्याने त्यांना आरामाची गरज असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. त्यामुळेच, त्यांचे आजचे सर्व कार्यक्रम रद्द झाले आहेत. विशेष म्हणजे बारामती येथील सभेत भाषण करताना त्यांचा आवाज बसल्याचे जाणवत होते. घसा बसल्याने त्यांचे शब्द फुटत नव्हते. तरीही, लेकीसाठी त्यांनी चार ते पाच मिनिटांचे भाषण करुन बारामती गाजवली. रोहित पवार यांनी त्यांच्या प्रकृतीची माहिती दिली आहे.
यावेळी रोहित पवार यांनी शरद पवार यांची भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली. त्यानंतर, माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी प्रकृतीची अपडेट माहितीही शेअर केली आहे. शरद पवार हे गेल्या 20 दिवसांपासून निवडणूक प्रचारासाठी रात्र दिवस फिरत होते. या लोकसभेच्या निवडणुकांच्या धावपळीतून फक्त चार तास झोपायचे. आता शरद पवार यांची तब्येत चांगली असल्याची माहिती रोहित पवार यांनी दिली. तसेच, आज बीड भागात त्यांच्या सभा आणि दौरा होता, तसेच पुण्यातही त्यांची सभा होणार होती. मात्र, प्रकृती अस्वास्थेमुळे त्यांचे आजचे सर्वच दौरे रद्द करण्यात आल्याचेही रोहित यांनी सांगितले.
बजरंग सोनावणेंची फेसबुक पोस्ट
साहेब, तुम्ही तुमच्या तब्येतीला जपा! तब्येतीच्या कारणास्तव उद्या माझ्या प्रचारार्थ आयोजित आष्टीतील सभेला आपण येणार नाही, हे समजलं आणि मला साताऱ्याच्या सभेची आठवण झाली. तेव्हा तुम्ही पावसाला थांबू शकला नव्हतात, पण तेव्हा पाऊसही तुम्हाला थांबू शकला नाही. तुमची तब्येत खराब झाल्याचे समजले. तुम्ही मागील पाच-सहा दशके अशा कित्येक निवडणुका बघितल्या असतील. तुमच्या नावावरच झाल्या त्या! पण साहेब, आता आमचं ऐका! आता ही खिंड आम्हालाच लढू द्या. तुम्ही फक्त आणि फक्त तब्येतीला जपा.
लढणं, तेही विपरीत परिस्थितीत, तुम्ही या देशाला दाखवून दिलं आहे. हा विजय तुमच्या पायावर आणून ठेवतो! आता पुढची जबाबदारी आमची आहे. ही निवडणूक आता शरद पवारांचे कार्यकर्ते म्हणूनच आम्हाला लढू द्या! साहेब फक्त प्रकृतीची काळजी घ्या. महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकत नाही हा इतिहास आहे. तो इतिहास आम्ही जपू, तुम्ही फक्त, तब्येतीला जपा साहेब. आणि तुमचा आशीर्वाद पाठीशी राहुद्या.
– तुमचा, बजरंग बप्पा!