बारामती : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांची लोकसभा निवडणुकांनंतर राज्यसभेवर जाण्याची संधी हुकली असल्यामुळे छगन भुजबळ हे नाराज आहेत. भुजबळ हे आता शरद पवार गटातच माघारी येतील, अशी चर्चा सुरु होती. या घडामोडीवर शरद पवार यांनी छगन भुजबळ यांच्या घरवापसीविषयी भाष्य केले.
शरद पवार हे गुरुवारी बारामतीमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी शरद पवार यांना छगन भुजबळ यांच्याविषयी विचारणा करण्यात आली. तुमचे जुने सहकारी छगन भुजबळ यांना आता पश्चाताप होत असल्याचे दिसत आहे. त्यांच्याकडून परतीचे संकेत मिळत आहेत. याबाबत तुम्हाला काय वाटते, असा प्रश्न शरद पवारांना विचारण्यात आला. छगन भुजबळ यांच्या विधानाचा अर्थ काय घ्यायचा, याबद्दल शरद पवार यांना प्रश्न विचारण्यात आला असता, त्यांनी स्पष्ट उत्तर दिलं.
छगन भुजबळ यांच्या या विधानामागची पार्श्वभूमी काय हे मला माहित नाही. माझी त्यांची वर्ष-सहा महिन्यांत भेट नाही. त्यामुळे त्यांच्या विधानाबद्दल मला काही माहित नाही असे शरद पवार म्हणाले. त्यांच्याकडून कोणताही संपर्क साधण्यात आलेला नाही, असेही पवार यांनी स्पष्ट केले आहे. आधी लोकसभा आणि त्यानंतर राज्यसभेसाठी उमेदवारी न मिळाल्याने छगन भुजबळ नाराज असल्याची चर्चा होती. याच दरम्यान, त्यांनी केलेल्या काही वक्तव्यांमुळे संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे भुजबळ नेमकं कोणतं पाऊल उचलणार? याबद्दल अनेक चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहेत.