पिंपरी-चिंचवड : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पिंपरी-चिंचवड शहरात मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. पिंपरी चिंचवड शहर अजित पवार यांचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र, लोकसभा निवडणुकीत अजित पवारांना मोठा धक्का दिल्यानंतर शरद पवार आता अजित पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्याच्या तयारीत असल्याचं दिसत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्षांनी नुकतीच शरद पवार यांची भेट घेतली आहे. तसेच राष्ट्रवादीचे १६ नगरसेवकही शरद पवार याना भेटले आहेत. या भेटीनंतर हे सर्वजण शरद पवारांच्या गटात प्रवेश करण्यासाठी इच्छुक असल्याचा दावा काही वृत्तपत्रांकडून केला जात आहे.
अशातच आता शहरातील राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना आपल्या बाजूने वळवून शरद पवार हे अजित पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्याच्या तयारीत असल्याची चर्चा रंगू लागल्या आहेत.
ते परत आल्यास आम्ही त्यांचं स्वागत करू : शरद पवार
यासर्व घडामोडीवर शरद पवार यांनी भाष्य केलं आहे. ते म्हणाले, पक्षात परत येण्याची इच्छा असलेल्या लोकांना भेटण्यासाठी मला रोज दोन-तीन तास द्यावे लागत आहेत. आजही काही लोक आम्हाला भेटायला येणार असून पक्षात येणारे लोक खूप आहेत.
तसेच यामध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेतील नगरसेवकांचा अपवाद नाही. तिथल्या अनेक नगरसेवकांनी आमची भेट घेतली असून ते पक्षात परतण्यास इच्छुक आहेत. त्यांनी जो काही निर्णय अलीकडच्या काळात घेतला तो हिताचा नव्हता. या निष्कर्षाने ते परत येऊ लागले आहेत आणि ते परत आल्यास आम्ही त्यांचं स्वागत करू, असं शरद पवार म्हणाले.