बुलढाणा : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आणि नातू रोहित पवार यांनी ते मराठा आहेत की ओबीसी, हे जनतेसमोर जाहीर करावे, असे आवाहन शिवसेना खासदार प्रतापराव जाधव यांनी केले आहे. नामदेव जाधव यांना काळं फासण्याच्या घटनेचाही त्यांनी तीव्र निषेध केला आहे. बुलढाण्यात माध्यमांशी बोलताना त्यांनी हे विधान केले आहे.
नामदेव जाधव यांना काल राष्ट्रवादी काँग्रेस गटाच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं होत. या घटनेचा खा. जाधव यांनी जाहीर निषेध नोंदवला आहे. ते पुढे बोलताना म्हणाले, नामदेव जाधव यांना काळं फासण्याच्या घटनेचा आम्ही तीव्र निषेध करतो. खरं तर शरद पवार यांचे व्हायरल केलेलं जातीचे प्रमाणपत्र एका वेबसाईटवरून काढलं आहे, अशी माहिती खासदार जाधव यांनी दिली.
ते प्रमाणपत्र चुकीचे किंवा खोटं असेल तर संबंधित वेबसाईटविरुद्ध पवारांनी कारवाई करायला पाहिजे. ते करण्याचं सोडून जाधव यांना काळ फासण्यात आलं. शरद पवार किंवा रोहित पवार यांनी मीडिया समोर येऊन शरद पवार मराठा की ओबीसी, खरं काय ते जनतेला सांगावं. असे शिवसेनेचे खासदार जाधव म्हणाले.