पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या इंडिया आघाडीच्या समावेशाबाबत मोठं भाष्य केलं आहे. प्रकाश आंबेडकर यांना इंडिया आघाडीत घ्यायचं की नाही याबाबत मतमतांतरं असताना, शरद पवारांनी स्पष्टपणे सांगितलं आहे. शरद पवार म्हणाले, “प्रत्येकाला आपला निर्णय घेण्याचा अधिकार आहे. इंडिया आघाडीच्या बैठकीत मी स्वतः काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना सांगितले की, प्रकाश आंबेडकर यांना आपल्यासोबत घेतले पाहिजे.
शरद पवारांनी सोमवारी पुण्यातील भीमथडी यात्रेला हजेरी लावली. यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना पवारांनी विविध विषयावर भाष्य केलं. यावेळी त्यांना प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित आघाडीला इंडिया आघाडीमध्ये स्थान मिळणार की नाही? याबाबतचा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर शरद पवार म्हणाले,” इंडिया आघाडीची बैठक झाली, त्यावेळी मी स्वत: प्रकाश आंबेडकर यांना आपल्यासोबत घ्यायला हवं असं मत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना सांगितलं” असंही पवार म्हणाले.