संदीप टूले
केडगाव : महागाई किती वाढली आहे. मला सत्ता द्या, पन्नास दिवसात महागाई कमी करणार असं दहा वर्षापूर्वी मोदींनी सांगितले होते. मात्र, दहा वर्षात महागाई कमी नाही झाली नाही तर वाढली आहे, अशी टीका शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केली आहे. आज दौंड तालुक्यातील वरवंड येथे बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.
मोदींच्या केवळ घोषणाच : शरद पवार
पुढे बोलताना म्हणाले, मोदींनी आपला शब्द पाळला नाही. पेट्रोल डिझेलचे भाव कमी करणार असल्याचं सांगितलं होते. आज मात्र शंभर रुपयाच्या पुढे भाव गेले आहेत. तसेच दोन कोटी रोजगार देणार असल्याच देखील सांगितले होते. आज काय परिस्थिती आहे. रोजगाराचा प्रश्न गंभीर आहे. मोदींनी दोन कोटीची केवळ घोषणा केली होती. राहुल गांधी आणि त्यांच्या परिवाराने देशासाठी त्याग केला सेवा केली. तुम्ही त्यांच्यावर टीका करताय, असा हल्लाबोल शरद पवार यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर केला.
माजी आमदारांची आठवण अन् कामाचे कौतुक
दरम्यान, शरद पवार यांनी दौंडच्या माजी आमदारांची आठवण काढली. जगन्नाथ पाटसकर, सुभाष अण्णा कुल, रंजना ताई कुल, राजाराम बापू ताकवणे यांची आठवण काढत यांनी केलेल्या कामाचे कौतुक केले. तसेच आमदार राहुल कुल हे चांगले काम करत आहेत, तसेच दौंडचा कायापालट केला आहे, असे म्हणत त्यांचेही शरद पवार यांनी कौतुक केले.