पुणे : इंडिया आघाडीचे नेतृत्व काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी स्विकारावं, अशी सूचना काही सहकार्यांनी केली, त्याला अनेकांनी संमती देखील दिली. त्याचप्रमाणे संयोजक म्हणून बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारांनी जबाबदारी घ्यावी, अशी सूचना करण्यात आली होती. परंतु, संयोजक पदाची गरज नसल्याचं मत नितीश कुमारांनी मांडलं. त्यामुळे संयोजक पदाची नियुक्ती करण्यात आली नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवारांनी दिली.
एकविचाराने आगामी निवडणुकीला सामोरे जाण्याचा विचार आहे, अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी या बैठकीनंतर दिली. इंडिया आघाडीच्या बैठकीचं ऑनलाइन आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीमध्ये शरद पवार, ममता बॅनर्जी, सोनिया गांधी, राहुल गांधी यांनी देखील हजेरी लावली. काही महिन्यांत लोकसभेच्या निवडणुकांचं बिगुल वाजणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीची ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात होती.