पुणे : पुण्यात प्रतापराव पवारांच्या निवासस्थानी दिवाळीनिमित्त संपूर्ण पवार कुटुंब एकत्र आले. शरद पवार आणि अजित पवार दिवाळीनिमित्त एकत्र आल्याचं बोलला जात आहे, यावेळी कोणतीही राजकीय चर्चा नसल्याचं पवारांनी सांगितलं. यावेळी शरद पवारांनी दिवाळीच्या शुभेच्छा देत माणसाच्या आयुष्यात चढ उतार येत राहतात, अशा अनेक अडचणी असतात त्यामुळे वेळप्रसंगी अडचणींना तोंड द्यावे लागते पण काही दिवस संकटांचे विस्मरण करून कुटुंबासोबत घालवावे लागतात,असे शरद पवार यावेळी म्हणाले.
दिवाळीच्या पहिल्याच दिवशी पुण्यातील बाणेरमध्ये प्रतापराव पवारांच्या निवासस्थानी शरद पवार आणि अजित पवार यांच्यासह संपूर्ण पवार कुटुंबीय दिवाळीनिमित्त एकत्र आले होते. शरद पवार यांची दिवाळी दरवर्षी बारामतीतील गोविंद बाग निवास्थानी साजरी केली जाते. मात्र यावर्षी अजित पवार यांनी बंड करत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये सहभागी झाल्यामुळे पवार कुटुंबाची एकत्र दिवाळी साजरी होणार की नाही, याची जोरदार चर्चा सुरु होती. मात्र या भेटीनंतर चर्चेला पूर्णविराम मिळाला. या कौटुंबीक सोहळ्यात शरद पवार आणि अजित पवारही उपस्थित होते. दरम्यान, कोर्टात राष्ट्रवादी कोणत्या पवारांची यावरून दावे प्रतिदावे करणारे पवार काका-पुतण्या पुन्हा एकदा कुटुंबात एकत्र आल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
शासकीय आणि राजकीय बैठकीला अजित पवार अनुपस्थित
गेल्या काही दिवसांपासून अजित पवार डेंग्यू या आजारामुळे मंत्रिमंडळ बैठक असो, प्रदूषण विषयक बैठक असो किंवा अन्य कोणतेही शासकीय आणि राजकीय कार्यक्रम या बैठकांपासून अजित पवार दूर होते, मात्र प्रतापराव पवारांच्या घरी असलेल्या कार्यक्रमात अजित पवारांनी आवर्जून उपस्थिती लावल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे.