बारामती : लोकसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून धमक्या दिल्या जात असल्याची चर्चा सुरू आहे. असं असताना स्वतः शरद पवार यांनीच सुपे येथील भर सभेत ‘घड्याळाला मतदान केले नाही तर पाणी मिळणार नाही, कारखान्याला ऊस जाणार नाही’, असा मजकूर असलेली चिठ्ठी वाचून दाखवली आहे.
अशा धमक्यांना घाबरू नका, त्यांना दुरुस्त करण्याची वेळ आता आली आहे’, या शब्दात त्यांनी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे वाभाडे काढले आहेत. कितीही धमक्या द्या, तुमच्या धमक्यांना भीक न घालणारी ही अवलाद आहे, असा इशाराच शरद पवार यांनी दिला आहे.
शरद पवार आज बारामतीमधील जिरायत भागाच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी जनाई-शिरसाई पाणी योजनांसंबंधी भाष्य केले. राष्ट्रवादीतील फुटीनंतर तालुक्यात या सिंचन योजनेवरूनच आता श्रेयवाद सुरु झाला आहे. जनाई-शिरसाई योजनेच्या कामाची जबाबदारी मी ज्यांच्यावर दिली होती, त्यांनी ती पार पाडली नाही.
मी गेली २० वर्षे स्थानिक विषयात लक्ष घालत नव्हतो. परंतु आता लक्ष घालून मी माझी जबाबदारी पार पडणार आहे, असं पवार यांनी यावेळी स्पष्ट केले. बारामतीच्या जिरायत भागाने नेहमीच मला भरभरून प्रेम दिले आहे. त्यामुळे या माझ्या माणसांचे प्रश्न सोडवणे ही माझीच जबाबदारी असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.
पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, अनेकजण ८४, ८५ वय झाले असे म्हणतात. तुम्ही वय काढू नका, तुम्ही अजून काय पाहिले आहे? हा गडी थांबणारा नाही. ज्या लोकांनी साथ दिली, त्या लोकांना वाऱ्यावर सोडणार नाही. शेवटच्या श्वासापर्यंत जनहिताची कामे करत राहील. तसेच कृषिमंत्री असताना नरेंद्र मोदी यांच्या गुजरात राज्याला प्रचंड मदत केली. ते कोणत्या पक्षाचे आहेत यापेक्षाही एका राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि त्या राज्यातील शेतकरी सुखी करण्यासाठी मदत केली पाहिजे, हे धोरण नेहमी राबवले, असंही शरद पवार यांनी या वेळी सांगितले.