बारामती (पुणे) : मला लोक सांगायचे ताई तिसऱ्यादा निवडून आल्या आहेत, त्यांना संधी द्या. पण पात्रता असताना देखील स्वतःच्या मुलीला मी बाजूला ठेवलं आणि कार्यकर्त्यांना संधी दिली. सलग आठवेळा संसदरत्न मिळाला. काहीना काही योगदान असेल ना? असे म्हणत शरद पवारांनी आपली खंत कार्यकर्त्यांसमोर व्यक्त केली. त्यांनी बारामतीतील पदाधिकऱ्यांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी पुढे बोलतांना पवार म्हणाले की, आजची लढाई विचाराची लढाई आहे. जे लोकं आज गेले आहेत, ते राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडून आले आणि ते आज भाजपसोबत गेले. सत्ता येते आणि सत्ता जाते, ती सत्ता लोकांच्या जीवावरील असायला पाहिजे. लोकशाहीत विरोधी आणि सत्ताधारी असे दोन पक्ष असले पाहिजेत. लोकशाहीत एकच पक्ष असला तर तो हिटलरचा हुकूमशाहीचा पक्ष असतो. आपल्याला हुकूमशाहीचा पक्ष नको, लोकांचा पक्ष पाहिजे. सत्तेतला पक्ष काम करतो, विरोधी पक्ष लोकांमध्ये जाऊन काम करतो, असं शरद पवार यावेळी म्हणाले.
पुढे शरद पवार म्हणाले की, आज जे आपले लोक सोडून गेले आहेत, त्यांना आपण सत्तेत राहण्याची संधी दिली की नाही?, आज तिकडच्या गटात अनेकजण मनाने नाहीत पण भीतीने तिकडे गेले आहेत. काहीजण मनाने नाहीत पण सत्तेसाठी आहे. काहीजण मनाने नाहीत पण पदामुळे तिकडं आहेत. काहीजण विचार मांडणी देखील करू शकत नाहीत, असं शरद पवार म्हणाले.
लढाई करायला जिद्द लागते, जे लढाई करणार आहेत त्यांची जिद्द गेली आहे. जो आपल्या विरोधात प्रचार करणार आहे, त्याचा हात थरथर कापेल आणि तो मनाला विचारेल कुणाच्या विरोधात आपण प्रचार करत आहे. 1980 साली मी इंग्लंडला गेलो तेव्हा 70 होते, परत आल्यावर फक्त 6 जण राहिले. जे गेलं यांच्या जागी नवीन निवडून आले. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना कुणी केली? राज्यात पोहोचवली कुणी? सर्वसामान्य जनतेला सत्तेच्या खुर्चीवर बसवले कुणी? सगळ्या समाजाच्या लोकांना अनेकांना सत्तेतच्या खुर्चीवर बसवले. असं शरद पवार म्हणाले.