भोर : आयुष्यभर एकमेकांच्या कायम विरोधात असलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे यांची शनिवारी (ता.९) भेट घेतली. या दोन्ही नेत्यांच्या भेटीमुळे तालुक्यातील राजकारणात विविध चर्चांना उधाण आले आहे.
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. त्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षफुटीनंतर अनेक दिग्गज नेत्यांनी शरद पवार यांची साथ सोडली आहे. असे असताना आता आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्याकडून राजकीय गणितं जुळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यात शरद पवार यांनी माळवाडी (ता. भोर) येथील अनंतराव थोपटे यांच्या निवासस्थानी जाऊन शनिवारी सायंकाळी सव्वा पाचच्या सुमारास भेट घेतली.
यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, माजी खासदार नानासाहेब नवले उपस्थित होते. आमदार संग्राम थोपटे, राजगड ज्ञानपीठाच्या सचिव स्वरूपा थोपटे आणि पृथ्वीराज थोपटे यांनी त्यांचे स्वागत केले. पवार आणि थोपटे या दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे अर्धा तास चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे.
दहा वर्षांनंतर दोघांमध्ये भेट
यापूर्वी शरद पवार आणि अनंतराव थोपटे हे दहा वर्षांपूर्वी म्हणजे जून 2014 मध्ये भोरचे माजी नगराध्यक्ष अमृतलाल रावळ यांच्या शोकसभेच्या कार्यक्रमात दोघे एका व्यासपीठावर दिसले होते. दरम्यान, पुणे जिल्ह्यातील राजकारणात पवार आणि थोपटे हे एकमेकांचे शत्रू म्हणून ओळखले जात होते. मात्र, आताची राजकीय परिस्थिती पाहता, महाविकास आघाडीचे सरकार आणण्यासाठी दोघांनीही एकमेकांशी जुळवून घेतल्याचे दिसत आहे.