पुणे : पुण्यात महाराष्ट्र भाजपचे अधिवेशन पार पडले. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. तसेच मराठा आरक्षणावर भाष्य करत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. भारताच्या राजकारणात सर्वात जास्त भ्रष्टाचारी शरद पवार असून राज्यात पवारांनी भ्रष्टाचाराच्या संस्था तयार केल्या आहेत, अशी टीका गृहमंत्री अमित शाह यांनी शरद पवार यांच्यावर केली आहे.
पुढे बोलताना म्हणाले, आम्ही 2014 ला मराठ्यांना आरक्षण दिले. सरकार कुणाचे आले आणि आरक्षण गेले? आता पुन्हा आम्ही सत्तेत आलो आणि आरक्षण आले. त्यामुळे आरक्षणासाठी भाजपचे सरकार यायला पाहिजे. यांची सत्ता आली तर आरक्षण गायब होईल. जेव्हा जेव्हा महाराष्ट्रात भाजपचं सरकार येतं, तेव्हा तेव्हा मराठ्यांना आरक्षण मिळतं, शरद पवारांची सत्ता आल्यानंतर आरक्षण जातं, असं म्हणत अमित शाह यांनी शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला.
अमित शाह म्हणाले, भारतात सरकार कुणाचे झाले आणि विरोधी पक्षात कोण बसलं? राहुल गांधी हरल्यानंतर अहंकारी झाले आहेत. आमच्या 240 जागा आल्या आहेत, यांच्या सर्वांच्या मिळून पण आल्या नाहीत. आम्ही आज स्वर्गीय गिरीश बापट यांच्या या सभागृहात बसलो आहे. आज गुरुपौर्णिमा आहे मी सर्वांना शुभेच्छा देतो. 2024 मध्ये पुन्हा एकदा कमळ फुलणार आणि युतीचे सरकार येणार, असा दावा देखील अमित शाह यांनी केला आहे.
पुढे बोलताना म्हणाले, लोकसभा निवडणुकीत मी भाजप कार्यकर्त्यांची मेहनत बघितली आहे. याच कार्यकर्त्यांमुळे आपल्याला यश मिळाले आहे. 60 वर्षानंतर पहिल्यांदा नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले आहेत. काल रात्री देखील मला कार्यकर्ते भेटले. संभ्रम निर्माण करण्याचे काम सध्या विरोधक करत आहेत. राम जन्म्भूमिसाठी आम्ही वर्षानुवर्ष संघर्ष करून आम्ही मंदिर बनवून दाखवलं आहे, असं अमित शहा यावेळी म्हणाले.