पुणे: कोरेगाव-भीमा दंगल प्रकरणाच्या न्यायालयीन चौकशीत काही लोक माझ्याकडून वेगळ्या गोष्टी वदवून घेण्याचा प्रयत्न करत होते, असा आरोप शरद पवार यांनी केला. कोरेगाव-भीमाच्या संघर्षांमध्ये काही जातीयवादी प्रवृत्तींनी वेगळी भूमिका घेतली होती. या प्रकरणामुळे संपूर्ण देशात अस्वस्थता निर्माण झाली होती, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली.
देशातील बदलते राजकारण, त्यात येत असलेले चुकीचे प्रकार यावर शरद पवार यांनी सोशल मीडियातील तरुणांबरोबर व्यक्तिगतरीत्या प्रत्यक्ष संवाद साधला. मंगळवारी पहाटेपासून पवार यांना भेटण्यासाठी मार्केटयार्ड येथील निसर्ग मंगल कार्यालयात मोठी गर्दी झाली होती. पवार म्हणाले, राज्य सरकारने कोरेगाव-भीमा प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याची भूमिका घेतली. न्यायालयीन चौकशी सुरू झाली. एके दिवशी मला नोटीस आली. नोटिशीप्रमाणे मी चौकशीसाठी हजर राहिलो.
यावेळी काही वकिलांनी माझी उलट तपासणी घेतली. इतिहास पुसण्याचे काम काही जातीय प्रवृत्ती करत होते. त्याच्याविरोधात आवाज उठवण्याचे काम आंबेडकरी विचारांच्या काही तरुणांनी करून वस्तुस्थिती, सत्य बाहेर आणले.
उमेदवारीसाठी मुस्लिम समाजाचे साकडे
मुस्लिमांना सत्तेत भागीदारी द्यावी. चाळीस वर्षांपूर्वी फक्त एकच मुस्लिम आमदार पुण्यातून अमिनुद्दीन पेनवाले निवडून गेले होते. त्यानंतर कधीही मुस्लिमांना पुण्यात संधी मिळाली नाही. महाविकास आघाडीकडून यावेळी उमेदवारी द्यावी, अशी मागणी समस्त पुणे शहर मुस्लिम समाजाच्या वतीने निसर्ग मंगल कार्यालय या ठिकाणी झालेल्या बैठकीत शरद पवार यांच्याकडे करण्यात आली. हडपसर विधानसभा मतदारसंघातून माजी नगरसेवक अॅड. आयुब शेख यांना उमेदवारी देण्याची मागणी करण्यात आली.