पुणे: अनेक कारणांनी नाट्यसंमेलन साजरा होण्यास उशीर झाला. हे संमेलन निर्विग्न होत असल्याने त्याचा आनंद आहे. काळानुरूप नाटक हे बदलत गेले. आता कौटूंबिक नाटकासह आता ऐतिहासिक नाटक देखील होत आहेत. नवनवीन विषय नाटकात येत आहेत. राज्यभर नाट्य संमेलन हा सोहळा रंगणार आहे, असे १०० व्या नाट्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार उद्घाटन सोहळ्यादरम्यान म्हणाले. तसेच यावेळी बोलताना त्यांनी ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ या नाटकावर अप्रत्यक्ष टीका केली.
“वृद्ध कलाकारांच्या मानधनात वाढ करावी, घरकुल योजना करावी, नाट्यगृहाच्या भाड्याबाबतीत विचार करावा, यांसाठी विशेष अनुदान देण्यात यावे, असं देखील शरद पवार म्हणाले”.
‘रायगडाला जेव्हा जाग येते’ या नाटकावर अप्रत्यक्ष टीका करत शरद पवार म्हणाले,” वसंत कानेटकर यांचे ‘रायगडाला जेव्हा जाग येते तेव्हा’ हे नाटक महाराजांच्या कौटुंबिक बाबींवर जास्त भाष्य करते, परंतु, आज महाराज अधिक हतबल झालेले दाखवले असे भासते. ‘रायगडाला जेंव्हा जाग येते’ या नाटकात जाग म्हणजे ‘उभारी’ असा अर्थ अभिप्रेत आहे. मात्र, त्यामध्ये महाराजांचे शल्य अधिक दाखवले आहे, मी हे नाटक दिल्लीत पाहिले, सध्याचे प्रेक्षक महाराजांना कुटुंब कलहातील का दाखवले? असा प्रश्न विचारतील, आणि पुरावे ही मागतील”. शरद पवार पुढे म्हणाले,”ऐतिहासिक नाटकाची प्रेक्षक वाट पाहतो. पण इतिहासाचा विपर्यास करणे, इतिहास सोयीने दाखवणे आणि काही खल प्रवृत्तीचे उदात्तीकरण करणे थांबवणे गरजेचे आहे”.