गणेश सुळ
बारामती, (पुणे) : बारामती लोकसभा मतदार संघात विद्यमान खासदार सुप्रिया सुळे विरूध्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सूनेत्रा पवार अशी लढत निश्चित मानली जात आहे. अशातच आता माझी केंद्रीय मंत्री शरद पवार हे आपला पारंपरिक बालेकिल्ला असलेल्या मतदार संघातून स्वतः निवडणूक लढविण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघात ‘राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी’ अशी लढत होण्याची शक्यता आहे. या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागल्याने खुद्द शरद पवारच आता होमपीचवर उतरले आहेत. मंगळवारी २७ फेब्रुवारीला बारामती लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघनिहाय राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आढावा घेतला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे नाव आणि चिन्ह अजित पवार गटाला मिळाले. तर, शरद पवार गटाला ‘राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार’ हे नाव आणि ‘तुतारी’ हे चिन्ह मिळाले. येत्या लोकसभा निवडणुकीत बारामतीतून विद्यमान खासदार सुप्रिया सुळे या शरद पवार गटाकडून उमेदवार असणार आहेत. तर, त्यांच्या विरोधात त्यांच्याच घरातील उमेदवार असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अशातच आज शरद पवार यांनी पुरंदर, वेल्हे-भोर-मुळशी, इंदापूर, बारामती, दौंड, खडकवासला मतदारसंघांतील आढावा सकाळपासूनच घेण्यास सुरु केलं आहे.
तर शरद पवार स्वतः बारामतीतून लढणार
शरद पवार यांचा हा पारंपारिक बालेकिल्ला अबाधित राहावा म्हणून स्वतः शरद पवार बारामती लोकसभेची निवडणूक लढतील, अशी शक्यता राजकीय तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर आज पुण्यातील गुलटेकडी येथील निसर्ग मंगल कार्यालय या ठिकाणी बारामती लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघनिहाय आढावा बैठक स्वतः शरद पवार यांनी घेतली आहे.