पुणे : बालेकिल्ला असलेल्या पिंपरी-चिंचवडमध्ये अजित पवारांना धक्क्यावर धक्के बसायला सुरुवात झाली आहे. पिंपरी चिंचवडचे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्यानंतर आता अजित पवारांचे विश्वासू शिलेदार नाना काटे हे शरद पवार गटात जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. त्यामुळे अजित पवार गटात मोठी खळबळ उडाली आहे.
…तरी मी निवडणूक लढणारच : नाना काटे
आगामी काळात चिंचवड विधानसभेचे तिकीट महायुतीकडून भाजपला गेले, तरी मी इथं निवडणूक लढणार असल्याचं मत नाना काटे यांनी केलं आहे. त्यांच्या विधानाने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. गेल्या विधानसभा पोटनिवडणुकीत नाना काटे हे राष्ट्रवादीकडून रिंगणात उतरले होते.
त्यावेळी भाजपाच्या अश्विनी जगताप यांच्याकडून त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. मात्र, आता येत्या निवडणुकीत पुन्हा उभं राहणार. काहीही झालं तरी, मी चिन्हावरचं निवडणूक लढणार असल्याचा निर्धार नाना काटे यांनी व्यक्त केला आहे.
नेमकं काय म्हणाले नाना काटे?
नाना काटे म्हणाले, आगामी विधानसभा निवडणूक मी लढवणार आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघात आमची ताकद आहे. जरी महायुतीचे तिकीट भाजपला गेले, तरी मी विधानसभा निवडणूक लढवणार आहे. मी विधानसभेच्या अनुषंगाने अजितदादांची भेट घेतली होती. त्यावेळी तू तुझ्या पद्धतीने काम सुरू ठेव असे म्हणत मला संकेत दिले आहेत. तसेच जे काही असेल ते पुढे पाहू, असंही अजित दादा म्हणाले.