पुणे: खासदार सुप्रिया सुळेंचे संसदेतील काम उत्तम आहे, त्यामुळे आज मी तुमच्यासमोर बारामतीचा उमेदवार जाहीर करतो असे म्हणत शरद पवारांनी सुप्रिया सुळे यांच्या नावाची घोषणा केली आहे. आमदार संग्राम थोपटेंनी आपल्योसोबत राहावे, शरद पवार पाठिशी असल्यावर विकास काय असतो, ते मी दाखवून देईन असंही ते म्हणाले. ते भोरमधील महाविकास आघाडीच्या सभेत बोलत होते.
खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी भोरमध्ये आघाडीच्या सभेचं आयोजन करण्यात आले होते. काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांनी या सभेचे नियोजन केले होते. त्यामध्ये बोलताना शरद पवारांनी आपल्या पक्षाच्या पहिल्या उमेदवाराची घोषणा केली. त्यामुळे बारामतीमध्ये आता सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी सरळ लढत होणार आहे.
माजी मंत्री अनंतराव थोपटे आणि शरद पवार यांचा गेल्या 40 वर्षांपासून राजकीय संघर्ष आहे. त्यांचा हा संघर्ष पुढच्या पीढीमध्ये म्हणजे अजित पवार आणि संग्राम थोपटेंमध्येही असल्याचं अनेकवेळा दिसून येतो. आता बदलत्या राजकीय परिस्थितीनुसार शरद पवारांनी भोरच्या सभेच्या आधी अनंतराव थोपटे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली आणि हा 40 वर्षाचा संघर्ष मिटवला. त्यामुळे थोपटे यांचे वजन आता सुप्रिया सुळे यांच्या पारड्यात पडणार हे निश्चित झालं असून त्यामुळे अजित पवारांची मात्र अडचण वाढणार आहे.