पुणे: जुन्नर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि सध्या अजित पवार गटासोबत असलेल्या अतुल बेनके यांनी आज (दि. २०) सकाळी शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांच्या निवासस्थानी शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी बेनके यांनी काही काळ पवार यांच्याशी संवादही साधला. त्यानंतर अजित पवार गटाचे आमदार पुन्हा शरद पवार यांच्याकडे पुन्हा परत येत आहेत का? अशी चर्चा सुरू झाली. याबाबत शरद पवार यांना जेव्हा विचारले तेव्हा, पवार यांनी आमदार अतुल बेनके यांचे वडील माझे मित्र होते, अशी आठवण सांगितली. तसेच नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत आमचे काम ज्यांनी केले, त्यांना आम्ही विसरणार नाही, असेही शरद पवार यांनी सांगितले. परंतु, त्यानंतर काही तासांतच घेतल्या दुसऱ्या एका पत्रकार परिषदेत कोण अतुल बेनके? असा प्रतिप्रश्न पवार यांनी विचारला.
दरम्यान नारायणगाव येथे खासदार अमोल कोल्हे यांच्या घरी शरद पवार आणि आमदार अतुल बेनके यांची भेट झाली. त्यानंतर माध्यमांशी बोलत असताना पत्रकारांनी पवार यांना अतुल बेनके यांच्या भेटीबाबत प्रश्न विचारला. तेव्हा पवार म्हणाले, “यामध्ये नवीन काय? लोक मला भेटायला येत असतात. तसेच अतुलचे वडील माझे मित्र आहे. तो माझ्या मित्राचा मुलगा आहे. राजकारणाचा निर्णय हा त्या वेळेसची परिस्थिती पाहून घेऊ.”
परंतु, या प्रतिक्रियेनंतर पुण्यात पुन्हा पत्रकार परिषदेत बोलत असताना त्यांनी कोण अतुल बेनके? असा प्रतिप्रश्न विचारला. या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी शरद पवारांना अतुल बेनके यांनी मांडलेल्या भूमिकेबाबत प्रश्न विचारला होता. आमदार अतुल बेनके म्हणाले, “आगामी विधानसभा निवडणुकीपर्यंत काहीही होऊ शकते. राष्ट्रवादीचे दोन्ही गट कदाचित एकत्रही येऊ शकतात.” आमदार अतुल बेनके यांनी केलेल्या दाव्याबाबत प्रश्न विचारला असता शरद पवार चांगलेच संतापले. पवार म्हणाले, “कोण अतुल बेनके? हे कोण आहेत? पक्षाच्या अध्यक्षाने उत्तर द्यावे, एवढा महत्त्वाचा माणूस आहे का? पत्रकारांनी कोणाबद्दल प्रश्न विचारावा, याचे काही तारतम्य ठेवावे. राजकारणात फडतूस माणसे असतात. ते काहीही विधाने करतात. त्यांची नोंद घ्यायची नसते, असंही पवार म्हणाले.