पुणे: राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या कन्या अॅड. पूर्वा वळसे पाटील या गेल्या काही दिवसांपासून आपल्या मतदारसंघात चांगल्याच सक्रिय झाल्या आहेत. यामुळे पूर्वा वळसे पाटील या आगामी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. मात्र, अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीत असलेल्या दिलीप वळसे पाटलांची कन्या शरद पवार यांच्या पक्षाकडून विधानसभा निवडणूक लढवणार, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. याबाबत शरद पवारांनी आज पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत महत्वाचे वक्तव्य केले आहे.
सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांची कन्या शरद पवार यांच्या पक्षाकडून विधानसभा लढण्यास इच्छुक आहे का? असा प्रश्न विचारला असता शरद पवार म्हणाले की, आमच्या बाजूने आमचा निर्णय हे येथील स्थानिक नेते घेतील. या पलीकडे आणखी कोणाचे नाव घेण्याची गरज वाटत नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान राज्यात सध्या मंत्री असलेले दिलीप वळसे पाटील हे आपल्या मतदारसंघात विकास करायला कमी पडले का? असे विचारले असता शरद पवार म्हणाले की, मतदारसंघातले प्रश्न सोडवले नाहीत का? हे तुम्ही दिलीप वळसे पाटलांनाच विचारा. मुळात ते किती वर्षांपासून सत्तेत आहेत. 35 वर्षे आमदार व त्यापैकी 25 वर्षे मंत्री आहेत. आता ज्यांना 25 वर्षात काही विकास करता आला नाही म्हणून ते आता काहीतरी सांगतात. मुळात याला संधीसाधूपणा म्हणतात, अशी टीका शरद पवार यांनी केली आहे.
शुक्रवारी निवडणूक आयोगाने तुतारी आणि ट्रम्पेट ही मुक्तचिन्हे गोठवण्याचा निर्णय घेतल्याने शरद पवार यांच्या पक्षाला मोठा दिलासा मिळाला आहे. याबाबत बोलताना शरद पवार म्हणाले की, याचे दोन भाग आहेत. स्थानिक स्वराज्य निवडणूकीचा निर्णय राज्य निवडणूक आयोग घेते. या आयोगाने शुक्रवारी निर्णय घेतला. यापुढे तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह राज्यातील सर्व निवडणुकांमध्ये कायम राहणार आहे. हा अतिशय चांगला निर्णय झाला आहे. मात्र, हा फक्त महाराष्ट्र राज्यापुरता लागू आहे. लोकसभा आणि विधानसभा या निवडणुकीसाठी देखील हाच निर्णय लागू करायला हवा, असे त्यांनी यावेळी म्हटले आहे.