पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार 3 दिवसांपासून बारामती दौऱ्यावर आहेत. पवार हे बारामती लोकसभा मतदारसंघातील अनेक गावात दौरे करुन येथील जनतेचे आभार मानत आहेत. तसेच, गेल्या 57 वर्षांपासून बारामतीमधील जनता माझ्या पाठिशी खंभीरपणे उभी आहे, त्यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीतही मला चिंता नव्हती. लोकं समोर येऊन बोलत नव्हते, पण दमदाटीच्या भाषणाला उत्तर देताना त्यांनी मतपेटीतून त्यांनी सर्वकाही दाखवून दिलं, असे म्हणत शरद पवारांनी अजित पवार यांचे नाव न घेता हल्लाबोल केला. आज (दि. २०) लोणी भापकर गावातून ग्रामस्थांना मोलाचा, वडिलकीचा सल्लाही पवारांनी दिला.
शरद पवारांनी गुरुवारी बारामती तालुक्यातील लोणी भापकर गावात जाऊन ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी बोलताना पवार म्हणाले की, जे काम करायचं होतं ते तुम्ही केलं आहे, मला काहीही सांगायची वेळ आली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींपेक्षा जास्त मताने तुमचा खासदार निवडून आला आहे. मोदी प्रत्येक सभेत सांगायचे मोदी की गॅरंटी. पण, त्यांची गॅरंटी काही चालली नाही. मोदींनी माझा बांध कोरला नाही. पण, मोदींचे धोरण हे आपल्या शेतकऱ्यांच्या हिताचे नव्हते, असे म्हणत शरद पवारांनी मोदींविरोधात घेतलेल्या भूमिकेवर भाष्य केले.
पुढे बोलताना पवार म्हणाले, जनाई-शिरसाई आणि पुरंदर उपसा योजना केल्या आहेत. या योजना केल्या पण ज्यांच्या हातात सत्ता आहे, त्यांनी आजपर्यंत त्याकडे बघितले नाही. आपल्याला आता हे सर्व बदलायचं आहे, आता राज्य हातात घ्यायचं आहे. तसेच नीरा नदीचे पाणी स्वच्छ करण्याची गरज आहे, दुधाचे अनुदान मिळण्यासाठी हालचाल करायची तयारी आहे का? तशी हालचाल करण्याची माझी तयारी आहे, असे म्हणत गावकऱ्यांना शरद पवारांनी बोलते केले.
निवडणुकीत कोणी दमदाटी केली, तरी कोणतं बटण दाबायचे, हे तुम्हाला चांगलं माहिती आहे, ते तुम्ही दाबलं. या लोकसभा निवडणुकीत एकही पुढारी नव्हता, कुठे गेले होते काय माहित नाही? मी विचारायचो हे होते का, ते होते का, तर ते कुणीही नव्हतं. कळलं नाही या नेत्यांना काय झालं ते? जेव्हा मतमोजणी झाली तेव्हा त्यांना कळलं. आपल्या आता हा चमत्कार विधानसभेला करायचा आहे. एक चमत्कार तुम्ही करायचा आणि एक चमत्कार मी. सर्वात पहिले पाणी आणायचं, मग कोणते कांडे रोवयाचे आणि कोणता डोस कधी द्यायचा, हे मी सांगतो, असे म्हणत आगामी विधानसभा निवडणुकांचे रणशिंगही शरद पवारांनी फुंकले. तसेच तुम्ही काहीही करा, पण जमीन विकू नका. तुम्ही जमीन विकू नका, आपण यातून मार्ग काढू असा मोलाचा सल्लाही शरद पवारांनी गावकऱ्यांना यावेळी दिला.