इंदापूर : केंद्रात भाजप सरकार सत्तेत आल्यास घटना बदलण्याचा धोका असल्याचे माजी केंद्रीय मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले. तसेच सध्या देशात वेगळी स्थिती असून, सत्तेचा वापर करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेच्या मुलभूत अधिकारावर हल्ला केला जात असल्याचेही त्यांनी म्हटले.
इंदापूर येथे महाविकास आघाडीने आयोजित केलेल्या शेतकरी व कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. शरद पवार पुढे म्हणाले, इंदापूर तालुका हा शांत विचाराने समाजकारण करणारा तालुका आहे. कै. शंकरराव पाटील उर्फ भाऊ हे कधीही हवेत राहिले नाहीत. त्यांनी डोक्यात कधीही हवा जाऊ दिली नाही. आज एक वेगळी स्थिती देशात आहे. देशाचा कारभार कोणाच्या हाती असावा प्रश्न आपल्यासमोर आहे. ही निवडणूक अत्यंत महत्वाची आहे, या सरकारने अनेक आश्वासने आपल्याला दिली. मात्र, सध्याच्या सरकारला शेतकऱ्यांची चिंता नाही, असे म्हणत शरद पवार यांनी केंद्र सरकारवर टीका केली.
तसेच कर्नाटकमध्ये एका मंत्र्याने संविधान बदलण्यासाठी मतदान द्या, असे विधान केले. भाजपच्या हातामध्ये देशाची सत्ता आहे. लोकांसाठी सत्ता वापरणं हे लोकशाहीमध्ये गैर नाही, पण सत्तेचा वापर करून संविधानावर हल्ला होण्याची शक्यता असली, तर त्यासाठी सामान्य माणसाने जागरूक राहावे, असे आवाहनही शरद पवार यांनी केले.
यावेळी आमदार रोहित पवार, रोहिदास जगताप, किशोर भोसले, आपचे रविराज भाळे, विवेक कोकरे, दादासो थोरात, इनायतअली काझी, छाया पडसळकर, शिवसेना तालुकाप्रमुख नितीन शिंदे, अमोल भिसे यांनी मनोगते व्यक्त केली.