पुणे : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पक्षात बंडखोरी करून सत्ताधाऱ्यांशी हातमिळवणी केल्यानंतर पक्षात उभी फूट पडली. या राजकीय उलथापालथीनंतर प्रथमच दिवाळी सण साजरा होत आहे. दरवर्षी पवार कुटुंबिय दिवाळीनिमित्त एकत्र येतात. मात्र, यंदाच्या दिवाळीत शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार का, याची उत्सुकता होती. भाऊबीजेनिमित्त सुप्रिया सुळे तसेच प्रतिभा पवार गोविंद बागेतून काटेवाडीत आधीच दाखल झाल्या होत्या. मात्र, शरद पवार अजित पवारांच्या निवासस्थानी जाणार का? याची उत्सुकता सर्वांनाच होती. ही चर्चा सुरू असतानाच अजित पवार यांनी गोविंद बागेत जाऊन दिवाळी साजरी केली. त्यानंतर आता आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. सुप्रिया सुळे यांनी काटेवाडीत जाऊन अजित पवार यांची भेट घेतल्यानंतर दोन तासांनी शरद पवारही अजित पवारांच्या निवासस्थानी आले आहेत. या निमित्ताने सर्वजण एकत्र येऊन दुपारचे जेवण घेणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.
अजित पवार यांनी काल संध्याकाळी उशिरा गोविंद बागेत जाऊन दिवाळी साजरी केली. त्यापूर्वी त्यांचे चिरंजीव पार्थ पवार हे गोविंद बागेत आले होते. यावेळी त्यांनी शरद पवार आणि प्रतिभा पवार यांचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर संध्याकाळी अजित पवार सहकुटुंब गोविंद बागेत आले. सर्वांनी एकत्र जेवण केले. गप्पा मारल्या. त्यानंतर एकत्रित फोटोही काढले. आज भाऊबीज असल्याने सुप्रिया सुळे या सकाळीच काटेवाडीत अजित पवार यांच्या निवासस्थानी गेल्या. त्यानंतर दोन तासांनी शरद पवारही अजितदादा यांच्या निवासस्थानी आले. पाडव्यानिमित्ताने संपूर्ण पवार कुटुंब गोविंदबागेत आले होते. दरवर्षीप्रमाणे यंदाही एकत्र फोटोसेशन केले. या फोटोत शरद पवार यांच्या मागे अजितदादा दिसत आहेत. सुप्रिया सुळे यांनी कुटुंबातील हे चार फोटो पोस्ट केले आहेत. Blessed! Embracing the beauty of our traditions with pride! असे कॅप्शन दिले आहे.
दरम्यान, भाजपचे नेते चंद्रकांत पाटील म्हणाले की, दिवाळीत पवार कुटुंब एकत्र येते. कितीही मतभेद असले तरी एकत्र येणे ही पवार कुटुंबाची खासियत आहे. पवार कुटुंब एकत्र आले तरी त्यांच्यातील मतभेद कायम आहेत, असे विधान चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले आहे. पाटील यांच्या या विधानामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.