बारामती: बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला मोठा धक्का बसला आहे. अजित पवारांसोबत सक्रिय काम करणाऱ्यांकडून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामधील अनेकांवर शरद पवार गटाकडून महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी बुधवारी बारामतीच्या गोविंद बागेत अनेक पदाधिकाऱ्यांना निवडीचे पत्र दिले. शरद पवार हे बारामतीत तीन दिवस मुक्कामी होते. या कालावधीमध्ये त्यांनी गेल्या अनेक वर्षापासून अजित पवारांसोबत सक्रिय काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर शरद पवार गटाची महत्त्वाची जबाबदारी सोपावली.
या पदाधिकाऱ्यांच्या निवडीमध्ये दोन वेळा पुणे जिल्हा परिषदेचे काम पाहिलेले माजी अध्यक्ष सतीशराव खोमणे यांची बारामती तालुका समन्वयक म्हणून निवड करण्यात आली आहे. बारामती तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाचे माजी अध्यक्ष राजेंद्र काटे यांची शरद पवार गटाकडून पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष व माळेगाव कारखान्याचे माजी संचालक शिवाजीराव जगताप यांची तालुकाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. शरद तुपे यांची बारामती तालुक्याच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आले आहे. तर पराग साळवी यांची देखील उपाध्यक्षपदी निवड केली. शरद पवार गटाकडून करण्यात आलेल्या या नियुक्त्यांची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगल्याचं पाहायला मिळत आहे.