पुणे : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बंडखोरी करून सत्ताधारी भाजप-शिवसेनेशी हातमिळवणी केल्यानंतर पक्षात उभी फूट पडली. शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट पडले. सत्तानाट्याच्या दुसऱ्याच दिवशी ८३ वर्षीय शरद पवार पुन्हा एकदा नव्या जोमाने मैदानात उतरले. सध्या पक्ष बांधणीसाठी ठिकठिकाणी त्यांचे दौरे सुरू आहेत.
शरद पवार यांनी नुकत्याच केलेल्या जुन्नर दौऱ्यात विघ्नहर साखर कारखान्याचे सर्वेसर्वा सत्यशील शेरकर यांचा पाहुणचार घेतला. त्यानंतर शेरकर शरद पवार गटात जाणार असल्याच्या चर्चा राजकारणात रंगल्या आहेत. आता शेरकर हे जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांना पर्याय होऊ शकतात, अशी शक्यता वर्तवली जात असल्यामुळे तालुक्याच्या राजकारणात मोठा उलटफेर होणार असल्याची चर्चा होत आहे.
दरम्यान, २ नोव्हेंबरला विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरू होत आहे. शरद पवार यांच्या हस्ते गळीत हंगामाचा प्रारंभ होणार आहे. या निमित्ताने पुन्हा पवार-शेरकर यांची भेट होणार आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण बदलत आहे. शरद पवार जुन्नरसाठी नव्या उमेदवाराची चाचपणी तर करत नाहीत ना, अशी चर्चा जोर धरत आहे.
याबाबत बोलताना विघ्नहरचे संचालक शेरकर म्हणाले की, शरद पवार साहेब यांना शेतकऱ्यांची जाण आहे. त्यांनी कृषिमंत्री या नात्याने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. शरद पवार हे विघ्नहर कारखान्याच्या गळीत हंगामासाठी जुन्नरला येणार आहेत. या पार्श्वभूमीवर माझ्या राष्ट्रवादी शरद पवार गटात जाण्याच्या चर्चेला जोर आला आहे. मात्र, अद्याप माझ्या प्रवेशाबाबत मी विचार केलेला नाही.