पुणे : पुण्यात आज भरदिवसा गँगस्टर शरद मोहोळची हत्या करण्यात आली. गोळ्या घालून त्याला मारण्यात आले. सर्वांसमोर मुळशी पेटर्न सिनेमाची अनुभूती आली. वाईटाचा शेवट वाईटच होतो, याची प्रचिती आली. योगायोग म्हणजे शरद मोहोळच्या लग्नाचा आज वाढदिवस होता. नेमक्या याचदिवशी मोहोळच्या आयुष्याची दोरी कापली गेली आहे.
शरद मोहोळ पुण्यातील कुख्यात गुन्हेगार होता. जुलै 2022 मध्ये शरद मोहोळला पुणे जिल्ह्यातून सहा महिन्यांसाठी तडिपार करण्यात आले होते. त्याशिवाय हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी, अपहरणाचे गुन्हे दाखल तसेच पिंटू मारणे हत्येप्रकरणी अटक करण्यात आली होती. दासवे गावचे सरपंच शंकर धिंडलेंचे जामिनावर असताना त्याने अपहरण केले होते. सरपंचांच्या अपहरणाप्रकरणी शरद मोहोळला पुन्हा अटक करण्यात आली.
दुसरा योगायोग म्हणजे पुण्यातील जर्मन बेकरी ब्लास्टमधील आरोपी मिर्झा बेगला आजच जामीन मिळाला आहे आणि मोहोळची हत्या झाली आहे. शरद मोहोळसोबत जेलमध्ये मिर्झा बेगल राहिला होता. मोहोळ आणि त्याचा म्होरक्या आलोक भालेराव यांच्यावर इंडियन मुजाहिद्दीनचा संशयित सदस्य आणि दहशतवादी खटल्यातील संशयित कतील सिद्दीकी याचा येरवडात गळा दाबून खून केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. मोहोळ आणि भालेराव या दोघांनाही जून 2019 मध्ये पुण्यातील न्यायालयाने निर्दोष ठरवले होते.
ज्या कोथरूडमध्ये मोहोळनं दहशत माजवली, त्याच कोथरुडचे आमदार असलेल्या माजी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत शरद मोहोळची पत्नी स्वाती मोहोळ यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. स्वाती मोहोळ यांच्यामार्फत शरद मोहोळ राजकारणात एन्ट्री करणार अशी चर्चा होती. मात्र, त्याआधीच त्याचा मृत्यू झाला.